Two youths killed in two-wheeler accident | दुचाकी अपघातात दोन युवकांचा मृत्यू

दुचाकी अपघातात दोन युवकांचा मृत्यू

जालना : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सिंदखेडराजा मार्गावरील माळाचा गणपतीजवळील वळण रस्त्यावर सोमवारी सोमवारी रात्री झाला.
या अपघातात योगेश पंढरीनाथ बडदे (२५ रा. जामवाडी) भोला खरात (रा. कन्हैय्यानगर) हे दोघे ठार तर मुकेश रघुनाथ वाघ (रा. जामवाडी) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगेश व मुकेश हे दोघे रोहित्र बसवण्याचे काम करत, या कामासाठी ते सोमवारी सिंदखेडराजा येथे गेले होते.
काम संपल्यानंतर ते रात्री दुचाकीवरून (क्र. एमएच २१, बीएन ४२८२) घरी येत होते. धारकल्याण फाट्याजवळ त्यांची कन्हैय्यानगर येथील भोला खरात याच्यांशी भेट झाली. ओळखीचा असल्यामुळे त्यांनी भोला खरात याला कन्हैय्यानगर येथे सोडण्यासाठी दुचाकीवर सोबत घेतले. तिघेही जालना शहराकडे येत असताना हा अपघात झाला. माळाच्या गणपतीजवळ खालच्या बाजूने असलेल्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला उडवले. यात दुचाकी चालवत असलेल्या योगेश बडदेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पळून गेला. अपघाताची घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी जखमी मुकेश व भोला यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना भोला खरात याचाही मृत्यू झाला. यातील मुकेशची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी सांगितले. अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

Web Title: Two youths killed in two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.