महामार्गावरील टेकाडावर आदळून दुचाकीस्वार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:58 IST2018-11-22T00:57:41+5:302018-11-22T00:58:03+5:30
अंबड तालुक्यातील शहागड येथे औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.

महामार्गावरील टेकाडावर आदळून दुचाकीस्वार गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथे औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. पिनू तिळवणे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी पिनू तिळवणे हे दुचाकी (क्र.एम.एच.२१.बीके.१४४४) वरून शहागडहून गोंदीकडे जात असतांना हुसेनिया मशिदी समोरील औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर समोरुन टेकाड आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने बेशुध्द पडले होते.
त्यांच्या नाक व कानातून रक्तस्राव होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी लोकमतशी बोलताना सांगितले.
अपघात होताच बाजूला असलेले वसीम तांबोळी, सूर्यकांत मापारी, मुक्तार तांबोळी, कदीर तांबोळी, अशफाक शहा तातडीने मदतीला धावले.
त्यानंतर तिळवणे यांना उपचारासाठी तातडीने औरंगाबादला हलवण्यात आले.
मागील तीन दिवसांपासून या महामार्गावर सलग तीन अपघात झाले आहे. या अपघातामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.