मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:31 IST2025-07-14T10:30:00+5:302025-07-14T10:31:40+5:30
टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दामू भीमराव रोजेकर हे शुक्रवारी दुपारी १ वाजता इयत्ता दुसरीच्या वर्गात दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत झोपलेले आढळले.

मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिपोरा बाजार (जि. जालना) : जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वर्गातच दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत झोपल्याचा प्रकार भोकरदन तालुक्यातील टाकळी येथे उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली असून संबंधित मुख्याध्यापकावर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.
टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दामू भीमराव रोजेकर हे शुक्रवारी दुपारी १ वाजता इयत्ता दुसरीच्या वर्गात दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत झोपलेले आढळले. माजी सरपंच बळीराम गावंडे यांनी शुक्रवारी शाळेला भेट दिली असता त्यांना शिक्षक अनुपस्थित असल्याचे दिसले. विद्यार्थी प्रांगणात खेळत होते. त्यांनी वर्गात जाऊन पाहिले असता, मुख्याध्यापक रोजेकर नशा करून झोपलेले दिसले. त्यांना जागेवर व्यवस्थित बसता येत होते. त्यांनी जागेवर लघुशंका केल्याचे निदर्शनास आले.
हा प्रकार माजी सरपंच गावंडे यांनी तत्काळ गटशिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून सांगितला. त्यानंतर गट समन्वयक एस. बी. नेव्हार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी मुख्याध्यापक रोजेकर यांच्या खिशात देशी दारूची भरलेली बाटली सापडली.
वरिष्ठांकडे अहवाल पाठविणार : गट समन्वयक नेव्हार म्हणाले की, संबंधित प्रकरणाचा अहवाल गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणार असून, पुढील कार्यवाही लवकरच होईल. मुख्याध्यापक रोजेकर यांचा असा गैरप्रकार हा नवीन नाही, ते याआधीही अशाच अवस्थेत आढळून आल्याचे पालकांनी सांगितले.
केंद्रप्रमुखांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल
गट समन्वयक नेव्हार यांनी पंचनामा झाल्यानंतर घटनेची माहिती सहायक फौजदार भास्कर जाधव यांना दिली. त्यानंतर जाधव यांनी घटनास्थळी येऊन मुख्याध्यापक रोजेकर यांना ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर चाचणीत नशा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर केंद्रप्रमुख डी.पी. वाघ यांच्या तक्रारीवरून शनिवारी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.