जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण, ३ गावांत प्रत्यक्ष मोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:44 IST2025-07-03T17:44:00+5:302025-07-03T17:44:22+5:30

जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना, बदनापूर व भोकरदन येथे भूसंपादन प्रक्रियेस वेग आला आहे.

Survey completed using drone for land acquisition of Jalna-Jalgaon railway line, physical counting in 3 villages | जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण, ३ गावांत प्रत्यक्ष मोजणी

जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण, ३ गावांत प्रत्यक्ष मोजणी

जालना : जालना ते जळगावदरम्यान रेल्वे मार्ग उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रशासनाने प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणातून कोणत्या शेतातील फळबागा, विहिरीसह इतर मालमत्तांची माहिती गोळा करण्यात आलेली आहेत, तसेच तीन गावांत भूसंपादनासाठी मोजणी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जालन्याच्या भूसंपादन अधिकारी सविता सूत्रावे यांनी दिली.

जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना, बदनापूर व भोकरदन येथे भूसंपादन प्रक्रियेस वेग आला आहे. या मार्गावर तब्बल १७ रेल्वेस्थानके असतील. नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रुक, पहूर, वाकोद, अजिंठा लेणी, अन्वी, सिल्लोड, भोकरदन, सायगांव, केदारखेड, राजूर, बवणेपंगरी, पिंपळगाव, नागेवाडी, दिनागाव या गावांत स्थानक असणार आहेत. दरम्यान, या मार्गावर १३० छोटे पूल, तीन नद्यांवर मोठे पूल, तीन बोगदे तयार करण्यात येणार आहेत.

सप्टेंबरपर्यंत मोजणी पूर्ण होणार
जालना तालुक्यातील १ व बदनापूर तालुक्यातील ८ गावांतील जमिनी रेल्वे मार्गासाठी भूसंपादित करण्यात येणार आहेत. यात भोकरदन तालुक्यातील १८९.०४ हेक्टर, तर बदनापूर तालुक्यातील १३७ हेक्टर व जालना तालुक्यातील ०.८२ हेक्टर जमीन रेल्वे मार्गासाठी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जालना, बदनापूर तालुक्यातील मोजणीची प्रक्रिया येत्या एका महिन्यात पूर्ण होईल, तर भोकरदन तालुक्याच्या मोजणीसाठी सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे.

सर्वेक्षणातून मिळाला डेटा
भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मावेजा देताना अनेक शेतकऱ्यांकडून आक्षेप नोंदविण्यात येतात. यामुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण, तसेच गुगल अर्थच्या माध्यमातून जीओ टॅगिंग करण्यात आले आहे. यामुळे प्रत्यक्षात शेतात कोणत्या गोष्टी आहेत याची संपूर्ण माहिती प्रशासनाने गोळा केली आहे. यामुळे मावेजा मिळण्याच्या प्रक्रियेस उशीर लागणार नाही.

तीन गावांत मोजणी पूर्ण
बदनापूर तालुक्यातील दावळवाडी, खादगाव, नजीकपांगरी या गावातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाची भूसंपादनासाठी मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. बदनापूर तालुक्यातील मांडवा या गावातील जमिनीची मोजणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

पहिल्यांदाच ड्रोन सर्वेक्षण
जालना जिल्ह्यात पहिल्यांदाच भूसंपादन प्रक्रियेमध्ये ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. जालना ते जळगाव रेल्वे मार्गासाठी संपादित करण्याच्या जमिनीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तसेच गुगल अर्थचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मावेजा मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल. सप्टेंबरपर्यंत मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून माेबदला देणे सुरू करण्यात येईल.
- सविता सुत्रावे, भूसंपादन अधिकारी, जालना

Web Title: Survey completed using drone for land acquisition of Jalna-Jalgaon railway line, physical counting in 3 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.