‘सुरक्षा मंत्र’ विद्यार्थ्यांसह महिला, नागरिकांसाठीही उपयुक्तच: वीरेंद्र मिश्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 19:25 IST2025-03-06T19:25:30+5:302025-03-06T19:25:52+5:30
जालना पोलिसांचे पुस्तक हिंदी-इंग्रजी भाषेतही यावे

‘सुरक्षा मंत्र’ विद्यार्थ्यांसह महिला, नागरिकांसाठीही उपयुक्तच: वीरेंद्र मिश्रा
जालना :जालनापोलिस दलाच्या वतीने महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले ‘सुरक्षा मंत्र’ हे पुस्तक सर्वांसाठीच उपयुक्त आहे. यातील माहिती पाहता आता हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदी भाषेत व्हावे, जेणेकरून देशपातळीवर याचा उपयोग करता येईल. शिवाय हे पुस्तक वेबसाईटवरही प्रसिद्ध करावे, जेणेकरून सर्व समाज घटकाला यातील माहितीचा लाभ होईल, असा विश्वास छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केला.
जालना पोलिस दलाच्या वतीने महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि सुरक्षा मंत्र या पुस्तकाचे विमोचन गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, जेईएसचे प्राचार्य डॉ. अग्निहोत्री, उद्योजक सुनील रायठठ्ठा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी दामिनी पथकातील महिला अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुस्तक तयार करण्यासाठी योगदान देणारे, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संजय सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर डीवायएसपी करिश्मा चौधरी यांनी आभार मानले. यावेळी विविध शाळांतील शिक्षक, विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
चौकट
घाबरू नका, तक्रार करा : बन्सल
शालेय मुला-मुलींना कायद्याचे ज्ञान व्हावे, वाहतूक नियम, सायबर क्राईमची माहिती व्हावी, यासाठी हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आले असून, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. कोणतीही अप्रिय घटना घडली तर मुलींनी घाबरून न जाता पोलिसांकडे तक्रार करावी. त्या तक्रारीनुसार आरोपीला पोलिसांकडून चोप दिला जाईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केला.
समाज घटकाचे मोठे योगदान : नोपाणी
पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ट्विन्स उपक्रमात शिक्षकांना कायद्याचे ज्ञान देण्यात आले असून, विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. त्यापुढील पाऊल म्हणून सुरक्षा मंत्र हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्याचा नक्कीच लाभ महिला, मुलींसह समाज घटकाला होणार आहे. त्यावर देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या क्युआर कोडमुळे उपयुक्त माहितीही सर्वांना मिळणार असल्याचे अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले.