टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा; रूई येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:49 IST2019-08-30T00:48:33+5:302019-08-30T00:49:17+5:30
अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा; रूई येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात..!
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी तक्रारीद्वारे ही बाब पंचायत समितीच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारीनुसार पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करीत गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
रुई येथे सद्यस्थितीत अधिकृत अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरीऐवजी बसस्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावरून पैठण डाव्या कालव्यातील साचलेले पाणी गावात खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा दूषित पाणी पुरवठा तात्काळ बंद करून पिण्यायोग्य व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पंचांसमक्ष पंचायत समितीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे एस. ए. जाधव यांनी सकाळी पंचनामा केला. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरण्याची भिती आहे. गावात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ताबडतोब कार्यवाही करून ग्रामपंचायतने अधिग्रहण केलेल्या विहिरीतूनच शुद्ध पाण्याचा टँकरद्वारे गावाला पुरवावा, असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. पंचनाम्यावर एकनाथ पटेकर, ईश्वर धाईत, शरद मुळे, कृष्णा खंडरे, तात्यासाहेब राजगुरू, संजय लहामगे आदींची स्वाक्षरी आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या पुढील भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.