तिकिटात हेराफेरी करून एसटी महामंडळाला चुना; ६८ वाहकांना बदल्यांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:52 IST2025-07-26T19:52:31+5:302025-07-26T19:52:50+5:30

चौकशीत सापडलेल्या ६८ वाहकांना एसटी महामंडळाने दोषी ठरवत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे वाहकांचे धाबे दणाणले आहेत.

ST Corporation defrauded by ticket manipulation; 68 conductors sentenced to transfers for fraud | तिकिटात हेराफेरी करून एसटी महामंडळाला चुना; ६८ वाहकांना बदल्यांची शिक्षा

तिकिटात हेराफेरी करून एसटी महामंडळाला चुना; ६८ वाहकांना बदल्यांची शिक्षा

- शिवचरण वावळे
जालना :
व्हाट्सॲप ग्रुपवर बस सुरक्षा व दक्षता पथकाचे लोकेशनचे अदानप्रदान करणे आणि तिकिटात हेराफेरी करून महामंडळाला चुना लावणाऱ्या जालनाछत्रपती संभाजीनगर विभागातील तब्बल ६८ वाहकांवर विभाग नियंत्रकांनी कारवाई केली आहे. फसवेगिरीत सापडलेल्या त्या वाहकांना शिक्षा म्हणून जालन्यापासून २०० किलोमीटर दूर असणाऱ्या विभागात बदली केली जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या जालना विभागातील काही वाहकांनी व्हाट्सॲप ग्रुप तयार केला होता. त्या आधारे महामंडळाच्या गुप्त माहितीचे आदानप्रदान होत होते. सहा महिन्यापूर्वी याची कुणकुण सुरक्षा, दक्षता पथकास लागली आणि त्यांनी चौकशी सुरू केली. चौकशीत सापडलेल्या ६८ वाहकांना एसटी महामंडळाने दोषी ठरवत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे वाहकांचे धाबे दणाणले आहेत.

कशी केली महामंडळाची फसवणूक
विविध मार्गावर बसेसची तपासणी केली जाते. ज्या मार्गावर महामंडळाचे तपासणी पथक आहे त्याची माहिती व्हाट्सॲपवर टाकून एकमेकांना दिली जात होती. पथक ज्या मार्गावर आहे त्यावेळी तिकिटात हेराफेरी केली जात नव्हती. पथक ज्या मार्गावर नाही त्या मार्गावर तिकिटात हेराफेरी होत होती. जसे की, जालन्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रवाशाला जालन्याच्या पुढील थांब्यावरील तिकिट देणे आणि जालना ते छत्रपती संभाजीनगरच्या तिकिटाचे पैसे घेणे असा प्रकार सुरू होता. या प्रकारामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत होता.

सहा महिन्यांपासून गुप्त विभागाकडून पाठपुरावा :
उत्पन्न कमी दाखवणाऱ्या बसवर गुप्त सुरक्षा व दक्षता पथकातील अधिकारी सहा महिन्यांपासून नजर ठेवून होते. सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, दोषी कर्मचाऱ्यांची दोन जिल्हे वगळून बदली केली जात आहे. शिवाय काहींच्या निलंबनाची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे सांगण्यात आले.

६८ वाहक दोषी 
अंबड बस स्थानकात २९ जुलै २०२४ रोजी एक वाहक सुरक्षा व दक्षता खात्याच्या वाहनाचे फोटो काढताना आढळून आला होता. त्याची चौकशी केली असता त्याच्या मोबाइलमध्ये वाहकांचा व्हाट्सॲप ग्रुप आढळून आला. ग्रुपमध्ये अधिकारी व मार्ग तपासणी पथकाचे खाते, वाहनाचे नंबर, कोणत्या मार्गावर जाणार आहेत या बद्दलची गुप्त माहिती पाठविल्याचे आढळून आले होते. त्यानुसार वरिष्ठांना प्राथमिक अहवाल दिला होता. त्यानंतर जालना व छत्रपती संभाजीनगर विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून चौकशी केली. त्यात ६८ वाहक दोषी आढळून आले.
- कल्पेश सोलंकी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, जालना

Web Title: ST Corporation defrauded by ticket manipulation; 68 conductors sentenced to transfers for fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.