Soybean seeds sprout in return | परतीच्या पावसाने सोयाबीनची दाणादाण

परतीच्या पावसाने सोयाबीनची दाणादाण

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : परतीच्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी, बँक, कृषी, अथवा महसूल विभाग यापैकी कोणत्याही एका ठिकाणी पिकांच्या नुकसानी संदर्भात तात्काळ माहिती देणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुक्रवारी, शनिवार, रविवारी व सोमवारी जोराचा पाऊस झाला. यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतक-यांच्या हाता- तोंडाशी आलेला बाजरी व सोयाबीनचा घास वाया गेला आहे. तसेच वेचणीला आलेल्या कापसाचे देखील नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नाही. तर अनेक ठिकाणी काढलेली सोयाबीन जमा करण्यात आली नसल्याने शेंगा काळसर पडल्या आहेत. यामुळे बळीराजा अडचणीत सापडला असल्याने तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी दादासाहेब भुतेकर यांच्यासह कडवंची येथील शेतक-यांनी केली आहे.
विमा संरक्षण घेतलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्यास शेतक-यांनी विमा कंपनी, कृषी विभाग, महसूल विभाग किंवा बँकेला कळविणे गरजेचे आहे. तसेच सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील सांगणे बंधनकारक आहे.
यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकºयांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून विहित नमुन्यात प्रस्ताव द्यावा, अशी माहिती ग्राहक सेवा केंद्राचे ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. अर्जासोबत विमाहप्ता भरल्याची पावती जोडणेही आवश्यक आहे.
हाती आलेल्या खरीप पिकांचे नुकसान ...
बदनापूर : तालुक्यात मागील एक- दोन दिवसांमध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे. या पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांबरोबर रबी पिकांनाही मोठा फायदा होणार आहे. मात्र, हाती आलेल्या मका, सोयाबीन व बाजरी पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
बदनापूर शहरासह रोषणगाव, दाभाडी, शेलगाव, बावणे पांगरी या पाचही मंडळातील विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाचा कापूस, तुर इ. खरीप पिकांसह शाळू ज्वारी, हरभरा या रबी पिकांनाही फायदा होणार आहे़ यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे़ हा पाऊस बदनापूर मंडळात ४६ मिमी, रोषणगाव ४३ मिमी, दाभाडी ११५ मिमी, शेलगाव ४५ मिमी, बावणे पांगरी ५० मिमी असा एकूण २९९ मिमी. झाला आहे. याची सरासरी ५९़८ मिमी आहे़
सध्या तालुक्यात बाजरी, सोयाबीन अशा खरीप पिकांची काढणी सुरू आहे. या पावसामुळे ही पिके भिजत आहे़ तसेच येणाºया आभाळामुळे तुरीच्या पिकावर रोगराई येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
शहरवासियांचे आरोग्य धोक्यात; धूर फवारणीची मागणी
बदनापूर शहरात सद्यस्थितीत चिखलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे डासांची संख्याही वाढली आहे. शहरवासियांना मलेरिया, डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांची लागण होऊ शकते, यासाठी नगरपंचायतच्यावतीने शहरात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Soybean seeds sprout in return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.