SSC Exam: धक्कादायक! जालन्यात १० वीचा पेपर फुटला?; परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स वाटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:12 IST2025-02-21T14:11:20+5:302025-02-21T14:12:57+5:30
परीक्षा केंद्रावर गोंधळाचं वातावरण तयार झालं असून याबाबत प्रशासनाकडून अधिक तपास केला जात आहे.

SSC Exam: धक्कादायक! जालन्यात १० वीचा पेपर फुटला?; परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स वाटल्या
Maharashtra SSC Exam 2025: महाराष्ट्रातील नऊ विभागांतील ५ हजार मुख्य केंद्रांवर आजपासून इयत्ता दहावीच्या अंतिम परीक्षेस सुरुवात झाली. सरकारने मोठा गाजावाजा करत कॉपीमुक्त अभियान राबवले जात असल्याचे सांगितले होते. मात्र दहावीचा पहिलाच पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात एका परीक्षा केंद्राबाहेर परीक्षेला सुरुवात होताच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स वाटण्यात आल्याची माहिती आहे.
दहावीच्या मराठी विषयाच्या परीक्षेला सुरुवात होताच बदनापूर तालुक्यातील एका परीक्षा केंद्राबाहेर १५ मिनिटांतच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स वाटण्यात आल्याचे समजते. या प्रकाराची माहिती समोर येताच परीक्षा केंद्रावर गोंधळाचं वातावरण तयार झालं असून याबाबत प्रशासनाकडून अधिक तपास केला जात आहे.
किती विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा?
राज्यातील एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा देणार असून, ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत २ हजार १६५ ने जास्त आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ यादरम्यान इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा घेतली जात आहे.
दरम्यान, परीक्षेसाठी १ लाख ८० मनुष्यबळ लागणार आहे. प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रवासावर जीपीएस ट्रॅकरद्वारे नजर राहणार असून, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका देतानाचे व त्या स्वीकारून कपाटामध्ये ठेवतानाचे चित्रण करणे बंधनकारक आहे. १५ मेपर्यंत निकाल शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे १५ मेपर्यंत लावण्यात येणार आहे, अशीही माहिती शरद गोसावी यांच्याकडून देण्यात आली आहे.