धक्कादायक! जालन्यात निवासी क्रीडा संस्थेत व्यवस्थापकाकडूनच मुलींचे लैंगिक शोषण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:52 IST2025-07-29T11:52:13+5:302025-07-29T11:52:55+5:30

सीसीटीव्ही नसलेल्या भागात नेऊन मुलींचे शोषण; जालन्यात क्रीडा प्रबोधिनीचा व्यवस्थापक अटकेत, पीडित मुलींच्या तक्रारीनंतर प्रकरण समोर

Shocking! Girls sexually abused by the manager at a residential sports academy in Jalna! | धक्कादायक! जालन्यात निवासी क्रीडा संस्थेत व्यवस्थापकाकडूनच मुलींचे लैंगिक शोषण!

धक्कादायक! जालन्यात निवासी क्रीडा संस्थेत व्यवस्थापकाकडूनच मुलींचे लैंगिक शोषण!

जालना : येथील जिल्हा परिषद निवासी क्रीडा संस्थेत अल्पवयीन मुलींचे व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात याने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांनी २६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवेळी मुलींनी खरात याच्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. या प्रकारणात खरात विरुद्ध रविवारी रात्री कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना येथे जिल्हा परिषदेच्या वतीने चालविण्यात येणारी निवासी क्रीडा प्रबोधिनी आहे. येथे २०१९ पासून खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. या क्रीडा प्रबोधिनीतील मुलांसह मुलींनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. परंतु, त्या क्रीडा प्रबोधिनीतील मुलींचे खरात याने १ जून ते २४ जुलै या कालावधीत लैंगिक शोषण केले. मुलींना लज्जा वाटेल, असे कृत्य करीत खरात धमक्या देत असल्याची तक्रार मुलींनी पालकांकडे केली होती. पालकांनी या प्रकरणात शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार धडकताच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शनिवारीच क्रीडा प्रबोधिनीला भेट देऊन मुलांसह मुलींशी चर्चा केली. चर्चेदरम्यान मुलींनी आपल्यावर घडलेल्या प्रसंगाचे केंद्रप्रमुख सुजाता भालेराव यांच्यासमोर कथन केले. मुलींनी तक्रारी केल्यानंतर या प्रकरणात गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी रविवारी कदीम पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार व्यवस्थापक प्रमोद खरात विरुद्ध कलम ७४, ७५ भा. न्या. संहिता २०२३ सह कलम ८, १०, १२ पोक्सोसह कलम ७५ बाल न्याय अधिनियम (काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. आरती जाधव या करीत आहेत.

सीसीटीव्ही नसलेल्या भागात कृत्य
मुलींना विविध कारणांनी सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी नेले जात होते. तेथे विविध कारणांनी मुलींना वाईट हेतूने स्पर्श करून लैंगिक शोषण करीत असल्याच्या तक्रारी मुलींनी केल्या आहेत.

चार मुलींच्या तक्रारी
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर या प्रकरणात प्रारंभी चार मुलींनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर इतर सात ते आठ मुलींनीही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे खरात याच्या काळ्या कारनाम्याबद्दल तक्रारी केल्याचे सांगण्यात आले.

दोन दिवसांची पोलिस कोठडी
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी प्रमोद खरात याला रविवारी रात्री अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Shocking! Girls sexually abused by the manager at a residential sports academy in Jalna!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.