वाळू माफियांनी घातला थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जेसीबी; भोकरदनमध्ये थरार, ९ जणांवर गुन्हे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:02 IST2026-02-17T19:00:33+5:302026-02-17T19:02:16+5:30
अधिकाऱ्यांनी माघार न घेता तब्बल १२ किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग करून अवैध जेसीबी जप्त केला आहे.

वाळू माफियांनी घातला थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जेसीबी; भोकरदनमध्ये थरार, ९ जणांवर गुन्हे!
भोकरदन (जालना) : तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपविभागीय अधिकारी बी. सरवनन आणि तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या पथकाला वाळू माफियांनी केवळ धमकावलेच नाही, तर वाहने आडवी लावून सरकारी कामात अडथळा आणला. मात्र, या अधिकाऱ्यांनी माघार न घेता तब्बल १२ किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग करून अवैध जेसीबी जप्त केला आहे.
नेमका प्रकार काय?
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार, भोकरदन परिसरात वाळू उपशाविरोधात मोहीम सुरू आहे. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जवखेडा ठोंबरे येथील पूर्णा नदी पात्रात महसूल पथकाने छापा टाकला. यावेळी एक विना नंबरचे ट्रॅक्टर आणि जेसीबी (MH 21 CG 2732) वाळू उपसा करताना आढळले. पथकाने कारवाई सुरू करताच एका पांढऱ्या कारसह पाच दुचाकींनी अधिकाऱ्यांचा रस्ता रोखला. "कारवाई केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील," अशी धमकी देत माफियांनी जेसीबी पळवून नेला.
१२ किलोमीटरचा थरार
माफियांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला, मात्र सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन आणि तहसीलदार काकडे यांनी स्वतःच्या वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू ठेवला. हा थरार तब्बल १२ किलोमीटर चालला. शेवटी निमखेडा शिवारातील एका मकाच्या शेतात लपवलेला जेसीबी अधिकाऱ्यांनी शोधून काढला आणि जप्त केला.
९ जणांवर गुन्हा, 'लोकेशन' देणाऱ्यांची आता खैर नाही
याप्रकरणी तलाठी अविनाश चव्हाण यांच्या तक्रारीवरून गजानन ठोंबरे, परमेश्वर ठोंबरे यांच्यासह ९ जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईवर बोलताना बी. सरवनन म्हणाले की, "अधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून वाळू माफियांना 'लोकेशन' देणाऱ्या पाळत ठेवणाऱ्यांवरही आता 'एमपीडीए' (MPDA) आणि हद्दपारीची कडक कारवाई केली जाईल."