सेलगाव (जि. जालना): बदनापूर तालुक्यातील खादगाव येथील शिनगारे पती-पत्नीच्या वाट्याला नियतीचा अत्यंत क्रूर खेळ आला आहे. समृद्धी महामार्गावर होणारे वारंवार अपघात पाहून ज्या कामाला त्यांनी दोन महिन्यांपूर्वी रामराम ठोकला होता, पोटाची खळगी भरण्यासाठी पुन्हा तिथेच जाणे त्यांच्या जीवावर बेतले. सोमवारी झालेल्या भीषण अपघातात मंगलबाई प्रकाश शिनगारे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रकाश शिनगारे हे थोडक्यात बचावले आहेत.
या घटनेमुळे शिनगारे कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली असून खादगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
"भीती वाटली म्हणून काम सोडलं होतं..."प्रकाश शिनगारे (वय ६०) आणि मंगलबाई हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्गावर स्वच्छतेच्या कामाला जात होते. मात्र, महामार्गावरील अपघातांचे सत्र पाहून त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यामुळेच दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांनी हे काम सोडले होते. परंतु, शेतात मजुरी कमी मिळत असल्याने आणि संसाराचा गाडा ओढणे कठीण झाल्याने, त्यांनी पुन्हा एकदा समृद्धीवर मजुरीला जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुर्दैवाने, हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
डोळ्यादेखत काळ बनून आला कंटेनरसोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काम संपवून सर्व महिला पिकअप गाडीत बसत होत्या. मंगलबाई देखील घरी जाण्यासाठी गाडीत चढत असतानाच, पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मंगलबाईंचा जागीच अंत झाला. प्रकाश शिनगारे हे त्यावेळी अपघातस्थळापासून थोड्या अंतरावर काम करत असल्याने ते या मृत्यूच्या दाढेतून सुदैवाने बचावले. मात्र, आपल्या डोळ्यादेखत पत्नीचा झालेला अंत पाहून ते सुन्न झाले आहेत.
गरिबीचा अटळ संघर्ष४०० रुपयांच्या रोजंदारीसाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कष्टकऱ्यांची ही व्यथा समृद्धी महामार्गावरील अनेक कामगारांची आहे. "काम केले तरच चूल पेटते" या विवंचनेपोटी भीती असूनही मृत्यूच्या उंबरठ्यावर काम करावे लागणाऱ्या कष्टकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मंगलबाईंच्या जाण्याने शिनगारे कुटुंबाचा मुख्य आधार हरपला आहे.
Web Summary : A couple returned to work on the Samruddhi highway due to financial constraints. A tragic accident occurred, resulting in the wife's death and the husband's narrow escape, highlighting the risks faced by laborers.
Web Summary : आर्थिक तंगी के कारण एक दंपति ने समृद्धि राजमार्ग पर काम फिर से शुरू किया। एक दुखद दुर्घटना में पत्नी की मौत हो गई और पति बाल-बाल बच गया, जिससे मजदूरों के सामने आने वाले खतरे उजागर हुए।