आईचा मृतदेह पाहताच मुलगा बेशुद्ध; समृद्धीवर काम करणाऱ्या महिला कामगारांच्या मृत्यूने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:35 IST2026-04-02T12:34:24+5:302026-04-02T12:35:33+5:30

समृद्धी महामार्गावरील 'त्या' अपघातानंतर गावागावात चुली पेटल्या नाहीत!

Samruddhi Mahamarga Accident: Son faints after seeing mother's dead body; Death of seven female workers working on Samruddhi Mahamarga causes stir | आईचा मृतदेह पाहताच मुलगा बेशुद्ध; समृद्धीवर काम करणाऱ्या महिला कामगारांच्या मृत्यूने खळबळ

आईचा मृतदेह पाहताच मुलगा बेशुद्ध; समृद्धीवर काम करणाऱ्या महिला कामगारांच्या मृत्यूने खळबळ

जालना : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृत आणि जखमींना रुग्णवाहिकांद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मृत आणि जखमींना पाहताच नातेवाईकांनी आक्रोश केला. कोणीची आई तर कोणी अर्धांगिनीचा मृत्यू झाला. त्यातच सुमनबाई आदमाने यांचा मृतदेह पाहताच, मुलगा बेशुद्ध झाला. तर काही जणांनी अश्रूंचा बांध मोकळा केला. 

नागपूर-समृद्धी महामार्गावरील कडवंची (ता.जालना) शिवारात सोमवारी कंटेनर पिकअपला धडकून झालेल्या अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला तर चौघी गंभीर जखमी झाल्या. अलकाबाई दादाराव आदमाने (४५), कांचनबाई प्रकाश आदमाने (५०), मीना परमेश्वर आदमाने (४४ सर्व रा. निधोना ता. जालना), ताराबाई गहिनाजी चौधरी (४५), कडूबाई रामदास मदन (४५), लक्ष्मीबाई संतोष मदन (४५ तिघी रा. केळीगव्हाण ता. बदनापूर) यांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले तर मृत सुमनबाई कचरू आदमाने (७० सर्व रा. निधोना ता. जालना) यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तर चार जखमींवर रुग्णायलात उपचार सुरू आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी उपचार केले. काही जणींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले.

पावसामुळे वीज गुल
अपघात घडल्यानंतर मृत व जखमींना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्याचवेळी जोराचा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील पीएम रूमचा पुरवठा खंडित झाला होता. तेथे आमदारांसह पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कपडे रक्ताने माखलेले
अंगावरून वाहन गेल्याने कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटलेला आहे तर काही जणांचे कपडे रक्ताने माखले आहेत. रुग्णालयात देखील रक्ताने माखलेले कपडे पडलेले होते.

राजकीय नेत्यांनी घेतली रुग्णालयात धाव
अपघाताची माहिती कळताच, आमदार नारायण कुचे, भास्करआबा दानवे, अक्षय गोरंट्याल, भाऊसाहेब घुगे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. शिवाय, नातेवाईकांना देखील धीर दिला. सर्वांनी नातेवाईकांना चांगली मदत देण्याचे आश्वासन दिले.

जोपर्यंत मदत मिळत नाही, तोपर्यंत पीएम होऊ देणार नाही
यात कंत्राटदारही जबाबदार असून, जोपर्यंत कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला जात नाही आणि कंत्राटदार व शासनाकडून मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही. तोपर्यंत आम्ही पोस्टमार्टम होऊ देणार नाही, त्यांच्यावर अंत्यसंकार देखील केेले जाणार नाही, असा इशारा माजी सभापती कैलास मदन व माजी सरपंंच दीपक आदमाने यांनी केला आहे.

अचानक सुट्टी घेतली अन् जीव वाचला
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये बदनापूर तालुक्यातील खादगाव येथील मुक्ता मोरे या अनपेक्षितपणे वाचल्या आहेत. अपघातामध्ये मृत पावलेल्या महिलांसमवेत मुक्ता मोरे देखील काम करतात. परंतु, त्यांनी बुधवारी काही कारणास्तव सुट्टी घेतली होती. कामावर गेल्या नसल्याने जीव वाचल्याचे मुक्ता मोरे यांनी सांगितले. गावातील अनेक महिला आपला जीव धोक्यात घालून गेल्या तीन महिन्यांपासून नियमितपणे समृद्धी महामार्गावर रोजंदारीने साफसफाईचे काम करण्यासाठी जात होत्या. त्यांना ४०० रुपयाची मजुरी देण्यात येत होती.

जिल्हाधिकाऱ्यांसह एसपींची भेट
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयूष नोपाणी, जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांची रुग्णालयात उपस्थिती होती. त्यांनी नातेवाईकांची समजूतदेखील काढली.

काय म्हणतात जिल्हाधिकारी
समृद्धी महामार्गावरती दुर्दैवी घटना घडली आहे. त्यात ६ ते ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना आम्ही माहिती दिलेली आहे. जे लोक जखमी आहे. त्यांना चांगले उपचार देण्याच्या सूचना दिलेल्या आहे.
-आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी

निधोना, केळीगव्हाण गावांत चुली पेटल्या नाही
समृद्धी महामार्गावरील घटनेत निधोना येथील चार, केळीगव्हाण येथील ३ तर खादगाव येथील एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, निधोना आणि केळीगव्हाण गावांतील चुली पेटल्या नाहीत. अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

उपचारांसाठी सूचना
अत्यंत दु:खदायक घटना घडलेली आहे. जखमी आणि मृतांमध्ये महिलाच आहेत. एक चालक आहे. सर्वांना चांगले उपचार देण्यात यावे, अशा सूचना केलेल्या आहेत. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून मृत आणि जखमींना मदत देण्याची मागणी केली. याबाबत मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे.
-अर्जुन खोतकर, आमदार

मदत जाहीर
अपघातातील जखमींवरील उपचाराबाबत डॉक्टरांना सूचना केल्या आहेत. मयतांच्या नातेवाईकांची व जखमींच्या नातेवाईकांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलवर संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी मयताच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
-नारायण कुचे, आमदार

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा
समृद्धी महामार्गावर दुर्दैवी घटना घडली. काही लोक जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. नातेवाईकांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. समृद्धीवर छोट्टा हाती घेऊन जाणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही एसपीसाहेबांकडे केली आहे.
-अक्षय गोरंट्याल, युवा नेते

Web Title : माँ का शव देखकर बेटा बेहोश; समृद्धि हादसे में महिला श्रमिकों की मौत।

Web Summary : जालना के पास समृद्धि महामार्ग दुर्घटना में आठ महिला श्रमिकों की मौत हो गई, चार घायल। माँ का शव देखकर एक बेटा बेहोश हो गया। परिजनों ने मुआवजे और ठेकेदार पर कार्रवाई की मांग की।

Web Title : Son faints seeing mother's body; Samruddhi highway accident kills workers.

Web Summary : Eight women workers died, and four were injured in a Samruddhi highway accident near Jalna. A son fainted upon seeing his mother's body. Relatives demand compensation and action against the contractor.