समृद्धीवर रक्ताचा सडा अन् फुटलेल्या बांगड्या; आठ महिलांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:21 IST2026-04-02T19:21:24+5:302026-04-02T19:21:46+5:30
४०० रुपयांच्या रोजंदारीसाठी गेल्या अन् कपाळावर सुतक आलं; समृद्धीवर ८ महिलांचा करुण अंत, पाहा थरारक वास्तव.

समृद्धीवर रक्ताचा सडा अन् फुटलेल्या बांगड्या; आठ महिलांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण उघड
जालना : चालकाला डुलकी लागल्याने कंटेनर पिकअपला धडकून झालेल्या अपघातातसमृद्धी महामार्गावर रोजंदारीचे काम करणाऱ्या आठ महिलांचा मृत्यू झाला. तर तिघींची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ही घटना सोमवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नागपूर - समृद्धी महामार्गावरील कडवंची (ता. जालना) शिवारात घडली.
जालना तालुक्यातील निधोना, बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील महिला नागपूर - समृद्धी महामार्गावर साफसफाईचे काम करण्यासाठी जात होत्या. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काम संपल्यानंतर गावाकडे परतण्यासाठी त्या चॅनल क्रमांक ३५२ जवळ पिकअपमध्ये (क्र. एमएच २० - सीटी २४६५) बसल्या. परंतु, त्याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्र. एमएच ४३ - सीई ६३८८) पिकअपला जोराची धडक दिली. या अपघातात सहा जणींचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी महिलांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मयत अन् गंभीर जखमींची नावे
अलकाबाई दादाराव आदमाने (४५), कांचनबाई प्रकाश आदमाने (५०), मीना परमेश्वर आदमाने (४४), सुमनबाई कचरू आदमाने (७०) (सर्व रा. निधोना, ता. जालना), ताराबाई गहिनाजी चौधरी (४५), कडूबाई रामदास मदन (४५), लक्ष्मीबाई संतोष मदन (४५) (तिघी रा. केळीगव्हाण, ता. बदनापूर), मंगलबाई प्रकाश शिनगारे (५५, रा. खादगाव) अशी मयत महिलांची नावे आहेत. तर प्रयागबाई बाबासाहेब वाघ (३०), कविता विठ्ठल चौधरी (३५), दिनेश रंगनाथ गायकवाड अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर रेवती योगेश मदन, कासाबाई मदन या दोघी किरकोळ जखमी झाल्या.
चालकाला नागरिकांनी दिला चोप
अपघातानंतर कडवंची व परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या तयारीत असलेला वाहन चालक प्रकाश राजवर (उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ओळख पटविणेही झाले मुश्कील
अपघातानंतर वाहनातील मृतदेह काढून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले होते. काहींच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांची ओळख पटविणेही मुश्कील झाले होते. समृद्धी महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता.
जमावाला आवरताना कसरत
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक शिवाजी साळुंके, गोपाळ ठोंबरे, परसुलवाले व एमएसएफचे रवी पवार, सुनील राठोड, मनोज पवार, महामार्ग विभागाचे स.पो.नि. अशोक काळे यांनी प्रथम घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अपघातस्थळी जमा झालेल्या नागरिकांना बाजूला करताना संबंधितांना कसरत करावी लागली.
होत्याचं नव्हतं झालं...
अपघातातील कंटेनर चालक प्रकाश राजवर (वय २५, रा. सुलतानपूर, यूपी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत झोपेची डुलकी लागल्यानेच हा भीषण अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. समृद्धी महामार्गावर चालकांचा थकवा आणि झोप हा चिंतेचा विषय बनला असून, या ७ महिलांच्या मृत्यूने महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सख्ख्या जावांसह चुलत सासूवर काळाचा घाला
या अपघातातील मयतांमध्ये जालना तालुक्यातील निधोना येथील अलकाबाई दादाराव आदमाने, कांचनबाई प्रकाश आदमाने या दोघी सख्ख्या जावा आहेत. तर सुमनबाई कचरू आदमाने या त्यांच्या चुलत सासू होत. घरची आर्थिक परिस्थती नाजूक असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून या दोघी जावा एकमेकींसोबत समृद्धी महामार्गावर रोजंदारीवर काम करण्यासाठी जात होत्या.