जालना जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:55 IST2019-07-03T00:54:02+5:302019-07-03T00:55:36+5:30
शहरासह तालुक्याच्या विविध भागात मंगळवारी दुपारी पावसाने समाधानकारक हजेरी लावली.

जालना जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरासह तालुक्याच्या विविध भागात मंगळवारी दुपारी पावसाने समाधानकारक हजेरी लावली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत होती.
चंदनझिरासह नागेवाडी, खादगाव, निधोना, दावलवाडी परिसरात मंगळवारी दुपारी प्रथमच मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर चांगला असल्याने सर्वत्र पाणीपाणी झाले होते. सत्यमनगर येथे पाण्याचे मोठे डबके साचले होते. या भागात यंदा एकही मोठा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरणी, लागवड रखडली होती. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.
बदनापूर तालुक्यातील दावलवाडी, खादगाव, सेलगाव, नजीकपांगरी परिसरात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. सुरुवातीला पडलेल्या एका पावसावर शेतकऱ्यांनी लागवड केली होती. आता जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. आजच्या मुसळधार पावसामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
माहोरा परिसरातही मंगळवारी दुपारी पावसाचे जोरदार आगमन झाले. या भागात प्रथमच दीड तास मोठा पाऊस झाला असून, बळीराजा सुखावला आहे. याशिवाय केदारखेडा, जळगाव सपकाळ, जामखेड, तळणी, जाफराबाद आदी परिसरातही मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली.
भोकरदन तालुक्यातील आन्वासह कोदा, जानेफळ गायकवाड, वाकडी, कठोरा बाजार, केदारखेडा परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जुई नदीला चौथ्या वेळेस पूर आला. पुरामुळे नदीकाठावरील शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच पेरणी केलेले बियाणेही वाहून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.
भोकरदन तालुक्यातील वडोद तागडा परिसरात दमदार पाऊस झाला. यामुळे रायगळ नदी पात्राजवळील शेतात पेरलेले सोयाबीन, कापूस, मका आदी पिकाचे नुकसान झाले. तसेच धामणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
राजूर परिसरात दोन दिवसांपासून संततधार
राजूर : राजूरसह परिसरात गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, मंगळवारीही पावसाने समाधानकारक हजेरी लावली.मागील आठ दिवसांपूर्वी राजूरसह परिसरात पाऊस झाला होता. त्या पावसावर शेतक-यांनी खरिपाची लागवड, पेरणीची कामे उरकली. परंतू त्यानंतर पावसाने डोळे वटारल्याने शेतक-यांत धाकधुक होती.
पावसाअभावी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. परंतू मंगळवारी दुपारी अर्धा तास संततधार पाऊस झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जालना-औरंगाबाद महामार्ग दीड तास ठप्प
चंदनझिरा : मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे जालना-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या नागेवाडी शिवारातील टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. टोलनाका परिसरात असलेला नाला ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळे टोलनाका परिसरातील दुभाजक पाण्याखाली आल्याने रस्ताच दिसत नसल्याने वाहतूक दीड तास ठप्प होती.
भोकरदन तालुक्यात पावसाचा जोर कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : शहरासह तालुक्यात मंगळवारीही दमदार पाऊस झाला. या पावसामुळे केळना जुई नद्यांना पूर आला होता. या पुरामुळे दानापूर येथील जुई धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच जुई नदीलाही पूर आला होता. नवे भोकरदन परिसरातील अनेकांच्या घरात पाणीही घुसले होते.
जुई धरणाच्या मागच्या भागात वाकडी, आणवा, गोळेगाव, उंडनगाव, पणवदोद परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जुई नदीला मोठा पूर आला होता. या पुरामुळे जुई धरणातील पाणी पातळी वाढणार आहे. सध्या धरणात १२ फूट पाणी साठा आहे. धारण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ४ ते ५ फूट पाण्याची गरज आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर धरण भरण्यास मदत होणार आहे. शेलूद येथील धामना धरणाच्या वरच्या भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे या धरणातील पाणी पातळी वाढणार आहे.
दरम्यान, नवे भोकरदन परिसरात म्हाडा परिसरातून या दोन्ही नाल्यांमधून आलेले पाणी रफिक कॉलनी, हबीब कॉलनी परिसरातील अनेकांच्या घरात घुसले. त्यामुळे संबंधितांची चांगलीच तारंबळ उडाली होती. मुख्याधिकारी अमित सोंडगे यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी शौकत अली यांनी नाला खुला करून पाणी काढा अशी मागणी केली. या परिसरातील काही जणांनी दोन्ही बाजूचा नाला अरुंद केल्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होतो आहे असे सांगितले. हा नाला खोल केला तरी आमच्या घरात पाणी येणार नाही, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली. यावेळी गजानन तांदुळजे, नगरसेवक कदिर शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.