पिंपळगावच्या मिरचीचा विदेशी बाजारात तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:04 AM2019-08-28T01:04:11+5:302019-08-28T01:04:59+5:30

पिंपळगाव रेणुकाई परिसरात उत्पादित होणाºया मिरचीला विदेशी बाजारपेठेतही मागणी वाढली आहे.

Pimpalgaon chilli hits the overseas market | पिंपळगावच्या मिरचीचा विदेशी बाजारात तडका

पिंपळगावच्या मिरचीचा विदेशी बाजारात तडका

googlenewsNext

रवी लोखंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात दिवसेंदिवस मिरचीची आवक वाढत आहे. येथील मिरचीला बाजारात समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे दुष्काळात हिरवी मिरची शेतकऱ्यांना वरदान ठरली आहे. विशेषत: पिंपळगाव रेणुकाई परिसरात उत्पादित होणा-या मिरचीला विदेशी बाजारपेठेतही मागणी वाढली आहे.
येथील मिरची खरेदी करण्यासाठी परराज्यातील अनेक व्यापारी येतात. सध्या मिरची बाजारात ५५० टन मिरचीची आवक असून, दररोज २ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी दरवर्षी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून मिरचीचे उत्पादन घेतो.
यंदा देखील परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही विकतचे पाणी घेऊन मिरची लागवड केली. महिन्याभरापासून मिरची बाजारात विक्रीसाठी येत आहे. ज्या शेतक-यांकडे पाणी नव्हते, त्यांनी जून महिन्यात मिरचीची लागवड केली. या शेतक-यांची देखील मिरची तोडणीसाठी आली आहे.
मिरची खरेदी करण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठा बाजार भरतो.
या बाजारात परराज्यातील तसेच परिसरातील २५ ते ३० व्यापारी येतात. सध्या बाजारात मिरचीची आवक वाढली असून, येथे सिल्लोड, कन्नड, बुलडाणा, चिखली, जळगाव इ. भागांसह चाळीस खेड्यांतील शेतकरी मिरची विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे येथे दररोज ५५० टन मिरची खरेदी केली जात आहे.
दररोज मिरचीतून २ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
मिरची जातेय परदेशात
व्यापारी या मिरचीला दिल्ली, वाशी, अझमगड, लखनौ, आग्रा, झाशी, गोरखपूर, छत्तीसगड, दुबई, बांगलादेश, श्रीलंका, मध्यप्रदेश, सूरत, वापी, बडोदा, जबलपूर, अहमदाबाद, रतलाम, कलकत्ता, कानपूर, कन्याकुमारी सारख्या नामांकित बाजारपेठेत पाठवितात. प्रारंभी ७ हजार रुपये भाव मिळणा-या मिरचीला सध्या बाजारात ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे.
पिंपळगाव रेणुकाई गावासाठी ठरले वरदान
पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजार गावासाठी वरदान ठरला आहे. येथील बाजारात परजिल्ह्यासह परिसरातील २१०० शेतकरी मिरची विक्रीसाठी घेऊन
येतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या मिरची बाजारामुळे गावातील हॉटेल्स, कृषी सेवा केंद्र, दुकाने आदी दुकानदारांचे देखील उत्पन्न वाढले आहे. तसेच परिसरातील मजुरांच्या हाताला कामही मिळाले आहे.

Web Title: Pimpalgaon chilli hits the overseas market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.