बोराडेंच्या धनगर आंदोलनास परवानगी नाकारली; जालना, अंबडमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:23 IST2026-01-17T12:23:12+5:302026-01-17T12:23:38+5:30
दीपक बोराडे हे १७ जानेवारी रोजी जालना येथून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास निघणार आहेत.

बोराडेंच्या धनगर आंदोलनास परवानगी नाकारली; जालना, अंबडमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी
जालना : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे बोराडेसमर्थक आंदोलन करण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर बोराडे यांना नोटीस देण्यास पुरेसा वेळ नसल्याने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शनिवारी, १७ जानेवारी रोजी पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत जालना आणि अंबड शहरात संचारबंदी लागू केली आहे.
दीपक बोराडे हे १७ जानेवारी रोजी जालना येथून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास निघणार आहेत. बोराडे हे जालन्यातून अंबड, जामखेड, पाचोड, दावलवाडी, पैठणनाका, शेवगाव, अहिल्यानगर, पाथर्डी, पंढरपूर, सांगोला, पुणेमार्गे मुंबईकडे जाणार आहेत. सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यात त्यांना आझाद मैदान पोलिसांनी त्यांच्या आंदोलनास परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्याने धनगर समाजाचे आंदोलनकर्ते जालना, अंबड शहरात एकत्र येऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता आहे. ही शक्यता पाहता आणि संबंधितांना पूर्व नोटिस देऊन सुनावणी घेण्यास वेळ नसल्याने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) व १६३ (२) अन्वये संपूर्ण जालना शहर व अंबड शहराकरिता १७ जानेवारी रोजी पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी शाळा, महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांना लागू राहणार आहे.
संचारबंदीत कोणाला सूट
या संचारबंदीतून शासकीय, निमशासकीय कार्यालये, दूध वितरण, पिण्याचे पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, रेल्वे व्यवस्था, दवाखाने, वैद्यकीय केंद्र, औषधी दुकाने, रुग्णवाहिका, विद्युतपुरवठा करणाऱ्या यंत्रणेला यातून सूट राहणार आहे.