'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:32 IST2025-10-24T13:30:36+5:302025-10-24T13:32:11+5:30
येत्या २ नोव्हेंबर रोजी अंतरवली सराटीत शेतकरी नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; शेतकरी संघटनांना विशेष निमंत्रण

'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
वडीगोद्री(जालना)- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकरी प्रश्नांवर मोठं आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत मागं हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला असून, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता रस्त्यावर कसा फिरतो, हेच पाहतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अंतरवलीत शेतकरी नेत्यांसोबत चर्चा
जरांगे पाटलांनी सांगितले की, येत्या २ नोव्हेंबर रोजी अंतरवली सराटीत शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, अभ्यासक आणि तज्ञ यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतीमालाला भाव आणि शेतकरी स्वावलंबन या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांसाठी आम्ही इमानदारीने लढाई लढू आणि ती जिंकू. हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार, असंही त्यांनी सांगितलं.
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शेतकरी संघटनांना आग्रहाचे निमंत्रण
या बैठकीसाठी शेतकरी संघटनांचे सर्व अध्यक्ष, कार्यकर्ते, अभ्यासक आणि तज्ञांना जरांगे पाटलांनी आग्रहाचे निमंत्रण दिलं आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची राज्यस्तरीय बैठक बोलावली जाईल आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.