'आमदारांच्या पगारात कपात नाही, शेतकऱ्यांच्या अनुदानात का?'; कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:29 IST2025-09-24T13:22:50+5:302025-09-24T13:29:15+5:30
'हे सरकार अधिकाऱ्यांचं आहे का?'; कृषिमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

'आमदारांच्या पगारात कपात नाही, शेतकऱ्यांच्या अनुदानात का?'; कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांचा सवाल
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी वडीगोद्री परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तीव्र संताप व्यक्त केला. “आमदार, खासदार आणि नोकरदारांच्या पगारात कपात होत नाही, मग शेतकऱ्यांच्या अनुदानातच कपात का होते? हे सरकार अधिकाऱ्यांचे आहे की शेतकऱ्यांचे?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांना विचारला.
भिजलेला कापूस हातात घेऊन मांडली व्यथा
बुधवारी सकाळी ११:३० वाजता मंत्री भरणे यांनी धाकलगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने भिजलेला कापूस हातात घेऊन अतिवृष्टीमुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था दाखवली. शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "मागील वर्षी फळबागांसाठी प्रति हेक्टरी ३६ हजार आणि कोरडवाहू पिकांसाठी १८ हजार रुपये मदत मिळत होती. मात्र, आता सरकार तटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत आहे."
यावेळी शेतकऱ्यांनी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, बँकांनी होल्ड केलेली खाती मोकळी करावीत, तसेच 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे कर्ज खात्यात वर्ग न करता थेट शेतकऱ्यांच्या हातात द्यावेत, अशा मागण्यांचे निवेदन कृषिमंत्र्यांना दिले.
'दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणार'
शेतकऱ्यांचा संताप पाहून कृषीमंत्री भरणे यांनी त्यांना आश्वासन दिले. ते म्हणाले, “जालना जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. कधी गारपीट होते, कधी अतिवृष्टी होते, तर कधी दुष्काळ पडतो. सगळ्यांचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळेल. कर्जमाफीच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.” यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार शिवाजी चोथे, माजी आमदार अरविंद चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.