Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे सत्तेचा लाडू आपल्याकडे येईल या भ्रमात कोणी राहू नये : हर्षवर्धन जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:08 IST2018-08-01T19:06:44+5:302018-08-01T19:08:07+5:30
मराठा आंदोलनामुळे आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू येईल अशा भ्रमात कोणी राहू नये असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला.

Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे सत्तेचा लाडू आपल्याकडे येईल या भ्रमात कोणी राहू नये : हर्षवर्धन जाधव
जालना : आताचे सरकार ही आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे. मराठा आंदोलनाचा फटका भाजपाला बसणारच आहे. मात्र, त्यामुळे आपोआपच आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू येईल अशा भ्रमात कोणी राहू नये असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला.
आज जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी आजचे सरकार हे आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे, हे जरी मान्य असले तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षे सत्तेत असताना आरक्षणा संदर्भात काहीही केले नसल्याची टीकाही केली. पत्रकार परिषदेस संजय लाखे पाटील, भास्कर दानवे, विष्णू पाचफुले, जगन्नाथ काकडे, प्रशांत वाढेकर, राजेंद्र गोरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अध्यादेश काढावा
सरकार आरक्षणाबाबत दिशाभूल करत असल्याचे सांगून, न्यायालय आणि मागास आयोगाकडे बोट दाखवत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढून समाजाला दिलासा देण्याचे काम करावे. याचा समावेश नंतर घटनेच्या परिष्ठ ९ मध्ये करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यालयात रद्द होणार नाही अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी केली.
मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष असावा
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे. असे असताना राजकीय पक्ष हे सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यासाठी आता मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढून आरक्षण मिळविण्यासाठी दबाव टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.