सावकारी फास ! व्याजासह रक्कम भरूनही जमीन बळकावणाऱ्या सावकाराच्या घराची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 06:39 PM2020-12-15T18:39:34+5:302020-12-15T18:41:40+5:30

सावकाराच्या घर व शेतातील घरातून विविध प्रकारचे २८ दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.

Lenders trapped! Raid at the house of the moneylender who grabbed the land even after paying the amount with interest | सावकारी फास ! व्याजासह रक्कम भरूनही जमीन बळकावणाऱ्या सावकाराच्या घराची झाडाझडती

सावकारी फास ! व्याजासह रक्कम भरूनही जमीन बळकावणाऱ्या सावकाराच्या घराची झाडाझडती

googlenewsNext
ठळक मुद्देगोद्री शिवारातील २० आर शेतजमीन गहाण ठेवलीतीन टक्के व्याजाने दोन लाख रूपये घेतले होते.

जालना : घेतलेली रक्कम व्याजासह परत करूनही शेतकऱ्याला शेतजमीन परत न करणाऱ्या सावकाराच्या घरावर जिल्हा निबंधक सावकारी तथा उपनिबंधक कार्यालयाने धाड मारली. ही कारवाई मंगळवारी सकाळी देहड (ता. भोकरदन) येथे दोन पथकांमार्फत करण्यात आली.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर वाळुबा सुसर यांनी आपली गोद्री शिवारातील २० आर शेतजमीन जितेंद्र संतोष जाधव (रा. देहड ता. भोकरदन) यांच्याकडे गहाण ठेवून तीन टक्के व्याजाने दोन लाख रूपये घेतले होते. रक्कम व्याजासह परत करूनही जितेंद्र जाधव हे जमीन परत करीत नसल्याची तक्रार सुसर यांनी जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदनचे सहायक निबंधक तथा पथकप्रमुख श्रीराम ए. सोन्ने व जालना येथील सहायक निबंधक तथा पथकप्रमुख पी. बी. वरखडे यांच्या दोन पथकांनी मंगळवारी सकाळीच देहड येथील जितेंद्र जाधव यांचे राहते घर व शेतातील घरावर धाडी मारल्या. दोन्ही घरांच्या झाडाझडती नंतर विविध प्रकारचे दस्तावेज जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख श्रीराम सोन्ने, पथकप्रमुख पी.बी.वरखडे यांच्यासह १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने केली. या कारवाईमुळे अवैध सावकारकी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

२८ दस्तावेज जप्त
या कारवाईत जाधव यांचे राहते घर व शेतातील घरातून विविध प्रकारचे २८ दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. यात सात खरेदी खत, एक करारनामा, कागदावरील नोंदी तीन, हिशोबाच्या १० वह्या, एलआयसीची एक डायरी, इतर सहा कागदपत्रे असे एकूण २८ दस्तावेज जप्त करण्यात आले.

Web Title: Lenders trapped! Raid at the house of the moneylender who grabbed the land even after paying the amount with interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.