जालना एमआयडीसी हादरली! रॉडच्या हल्ल्यात सुपरवायझरवरचे पाय फ्रॅक्चर; पिस्तूल लावून धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 20:07 IST2026-02-23T20:04:44+5:302026-02-23T20:07:16+5:30
पोलिसांच्या सायरनमुळे वाचला जीव! जालन्यात सुरक्षारक्षकाचे पाय तोडले; गावठी पिस्तूल दाखवून आरोपी फरार

जालना एमआयडीसी हादरली! रॉडच्या हल्ल्यात सुपरवायझरवरचे पाय फ्रॅक्चर; पिस्तूल लावून धमकी
जालना: "येथील एमआयडीसीमध्ये पुन्हा कामाला आला तर तुला गोळी घालून ठार मारीन," अशी धमकी देत पाच जणांच्या टोळीने एका सुपरवायझरवर लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने भीषण हल्ला केला. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत शालिक मुरलीधर वाघ (४०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजल्याने आरोपींनी पळ काढला, अन्यथा मोठी अघटित घटना घडली असती.
गाडीत झोपलेले असतानाच खेचले बाहेर
शालिक वाघ हे एमआयडीसीतील एका कंपनीत सुरक्षारक्षक आणि सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास ते उद्योग केंद्राजवळ आपल्या गाडीत झोपलेले होते. यावेळी पाच जणांनी अचानक येऊन त्यांना गाडीतून ओढले आणि लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर प्रहार करण्यास सुरुवात केली.
पिस्तूल लावून दिली धमकी
हल्ल्यादरम्यान एका आरोपीने वाघ यांच्या पाठीला गावठी पिस्तूल लावून, "तू एमआयडीसीत कामाला यायचे नाही, आला तर गोळी घालीन," अशी धमकी दिली. या हल्ल्यात वाघ यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने, त्याच वेळी चंदनझिरा पोलिसांच्या गस्ती पथकाच्या गाडीचा आवाज आल्याने आरोपींनी कारमध्ये बसून तिथून पळ काढला.
तीन आरोपी निष्पन्न, तपास सुरू
चंदनझिरा पोलिसांनी जखमी वाघ यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात तीन आरोपींची ओळख पटली असून दोन अनोळखी इसमांचा शोध सुरू आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.