जालना एसीबीची मोठी कारवाई: ५०० रुपयांची लाच स्वीकारणारा ७० वर्षीय स्टॅम्प विक्रेता जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:30 IST2026-03-17T17:27:51+5:302026-03-17T17:30:03+5:30
स्टॅम्पसाठी जादा पैसे मागणे पडले महागात; जालन्यात कारवाई.

जालना एसीबीची मोठी कारवाई: ५०० रुपयांची लाच स्वीकारणारा ७० वर्षीय स्टॅम्प विक्रेता जाळ्यात
जालना : ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या स्टॅम्प विक्रेत्यास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी जेरबंद केले. श्रीकांत मोहनराव बनसोड (७० रा. गंगापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
तक्रारदाराला शैक्षणिक कामासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता होती. यासाठी ते गंगापूर येथील एस. एम. बनसोड अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याच्या दुकानात गेले. त्यांना ५०० रुपये दराच्या १० स्टॅम्पची आवश्यकता होती. यासाठी श्रीकांत बनसोड यांनी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून सोमवारी पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, श्रीकांत बनसोड याने ५०० रुपयांची लाच स्वीकारली. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, एक मोबाइल व ५५०० रुपयांची रक्कम मिळून आली.
या प्रकरणी गंगापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सापळा अधिकारी सपोनि. शरदचंद्र रोडगे, कोमल शिंदे, पोलिस अधीक्षक बी. एस. जाधवर, पोहेकॉ. आतिश तिडके, गजानन खरात, अशोक राऊत, पोलिस अंमलदार गजानन कांबळे, भालचंद्र बिनोरकर यांनी केली आहे.