७ वारकऱ्यांचा बळी गेला, तरीही शेजारीच पुन्हा विहीर खोदली! जालनामार्गावर ३२ मृत्यूचे सापळे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:59 IST2026-03-04T14:58:01+5:302026-03-04T14:59:22+5:30
जालना-जळागाव महामार्गालगत उघड्या विहिरी; आणखी किती बळी जाणार ?

७ वारकऱ्यांचा बळी गेला, तरीही शेजारीच पुन्हा विहीर खोदली! जालनामार्गावर ३२ मृत्यूचे सापळे!
- राहुल वरशिळ
जालना : दीड वर्षापूर्वी तुपेवाडी आश्रमाजवळ १९ जुलै २०२४ रोजी एक जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या खुल्या विहिरीत कोसळली होती. यात सात वारकऱ्यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. तर काही जखमी झाले होते. या घटनेच्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी सारख्याच अंतरावर विहिरी आहेत. यात जीप कोसळलेली विहीर संबंधित शेतकऱ्याने बुजवून शेजारीच २० फुटांवर नवीन विहीर खोदली आहे. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या विहिरीला सध्या कडे टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गालगतच्या इतर विहिरी कधी बुजविणार? असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
भोकरदन-राजूर (राज्य मार्ग २२३) ते राजूर-जालना (राष्ट्रीय महामार्ग ७५३-ए) या राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर ३२ धोकादायक विहिरी आहेत. या विहिरी रस्त्यापासून १० ते २० फुटांवर असून, अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. काही जमिनीलगत तर काही जमिनीपासून दोन ते तीन फूट उंच आहेत. जालना-जळगाव मार्गावर ४ ते ५ फूट खोलगट भागातील विहिरी दिसत नाहीत. त्यांची खोली ५० ते ६० फूट आहे. या धोकादायक विहिरींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व विहिरी परवानगी न घेता खासगी शेतजमिनीत खोदल्यामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात आले आहेत. या मार्गावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. विशेषतः जत्रा, यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर भाविकांचा प्रवास होतो. यासंदर्भात स्थानिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत; परंतु याकडे स्थानिक प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
विहिरींवर कुंपण, फलक नसल्याने बनल्या मृत्यूचा सापळा
या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शेतकरी खासगी जमीन असल्याचे कारण देत परवानगी न घेता विहिरी खोदत आहेत; पण महामार्गालगत ३० मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा खोदकाम करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या विहिरी उघड्या असून, त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा, कुंपण अथवा इशारा फलक नसल्याने त्या ‘मृत्यूचा सापळा’ बनल्या आहेत.
देळेगव्हाण-गाढेगव्हाण पाटीजवळ पाच जणांचा मृत्यू
टेंभुर्णी-राजूर राष्ट्रीय महामार्गावरील देळेगव्हाण-गाढेगव्हाण पाटीजवळ २९ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ५ वाजता मार्निंग वॉक करणाऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक कार विहिरीत कोसळली होती. या अपघातात ५ जणांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. त्यानंतर सात तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर प्रशासनासह स्थानिकांना कार व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते.
भोकरदन-राजूर मार्गावरील धोकादायक विहिरींच्या ठिकाणांची यादी :
ठिकाण- संख्या
चांदई पाटीनजीक - २
बानेगाव पाटीनजीक - ४
बानेगाव प्रकल्पानजीक - ४
डावरगाव पाटीनजीक - ३
बरंजळा पाटीनजीक - ३
लिंगेवाडी पाटी ते सोयगाव देवी, कुंभारी पाटीदरम्यान - ७
तपोवन पाटी परिसर - १
तुपेवाडी आश्रम ते वसंतनगर परिसरात - ५
बावणे पांगरी पुलाजवळ - १
मानदेऊळगाव परिसर - १
पिंपळगाव परिसर - १
एकूण : ३२