Jalana: लोणार-मंठा महामार्गावर दोन अपघातात तिघांचा मृत्यू; दाम्पत्यासह तरुणाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:28 IST2025-12-01T14:27:20+5:302025-12-01T14:28:01+5:30
दुचाकीस्वारांना धडक ; दोन अपघातात तिघांचा मृत्यू

Jalana: लोणार-मंठा महामार्गावर दोन अपघातात तिघांचा मृत्यू; दाम्पत्यासह तरुणाचा समावेश
तळणी (जि. जालना) : लोणार-तळणी-मंठा या दिंडी महामार्गावर शनिवारी रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान तळणीकडून मंठ्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायरने दुचाकीवरील पती-पत्नीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात गजानन लोकडीबा कांगणे (४६) व रुखमीला गजानन कांगणे (४०) (दोघे रा. वाघाळा ता. मंठा) यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात लोणारकडून तळणीकडे येणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने समोरासमोर धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पहिल्या अपघातात तळणीकडून मंठ्याकडे भरधाव धावणाऱ्या स्विफ्ट डिझायरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. हा अपघात २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजे दरम्यान तळणीजवळील पेट्रोल पंपाजवळ घडला. एका नातेवाइकांच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून दाम्पत्य गावाकडे जाताना भरधाव स्विफ्ट डिझायर कारने (एमएच. २१, एएक्स १६२२) त्यांच्या दुचाकीला (एमएच. १४, इइ. २९८६) मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या समोरील व दुचाकीच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता वाघाळा येथे गजानन कांगणे व रुखमीला कांगणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. अपघातास्थळी कारमधील चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती उपस्थितांनी दिली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
दुचाकीस्वाराचा धडकेत मृत्यू
त्याच रस्त्यावरील दुसऱ्या घटनेत लोणारकडून तळणीकडे दुचाकीवरून येताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात २९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेदरम्यान वडगाव सरहद्दीजवळ घडला. या अपघातात दुचाकीवरील (एचएच. २१, बीसी. ३८९७) रविराज जीवन खेरमोडे ( वय २६ रा. तळणी, ता. मंठा) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२ वाजता रविराज खेरमोडे यांच्यावर तळणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रविराज आईसोबत मामाकडे राहत होता. एकुलता एक मुलगा काळाने हिरावला असल्याने तळणीत हळहळ व्यक्त होत आहे.