Jalana: 'महसूल पथक आले रे!'; वाळू माफिया पळाले, पण त्यांना 'लोकेशन' देणारे चौघे सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:49 IST2025-05-05T11:49:25+5:302025-05-05T11:49:45+5:30
गोंदी ते सिद्धेश्वर फाटा गोदावरी पात्रात अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला

Jalana: 'महसूल पथक आले रे!'; वाळू माफिया पळाले, पण त्यांना 'लोकेशन' देणारे चौघे सापडले
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :अंबड तालुक्यातील सिद्धेश्वर फाटा येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणारा एक हायवा महसूल पथकाने गोंदी पोलिसांच्या मदतीने आज, सोमवारी पहाटे साडेचार वाजता पकडला. विशेष म्हणजे, यावेळी महसूल पथकाची माहिती वाळू माफियांना देणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. माहिती देणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून एक दुचाकी, एक कार आणि मोबाईल असा ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
अंबड तहसीलदार यांना रविवारी रात्री वाळू तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान महसूल पथक गोंदी पोलिसांसह गोंदी-सिद्धेश्वर फाटा येथील गोदावरी नदीपात्रात पोहचले. यावेळी छापा पडणार याची आधीच माहिती मिळाल्याने वाळू तस्कर फरार झाले. केवळ एक वाळूने भरलेला हायवा पथकाच्या हाती लागला. ही कारवाई जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण, गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, मंडळाधिकारी जायभाये, महसूल कर्मचारी रमेश वालेकर व राजेश चव्हाण, पो हे कॉ. दीपक भोजने यांच्या संयुक्त पथकाने केली.
'लोकेशन' देणारे ताब्यात घेतले
महसूल आणि पोलिसांचे पथक गोदावरी पात्राकडे निघाले असता काही अंतरावर वाळू माफियांना मदत करणारे सक्रिय झाले. यामुळे पथकाने खाजगी गाडी वापरत रस्ता बदलला. मात्र, तरीही वाळू माफियांना 'लोकेशन' देणाऱ्यांनी पथकाचा एक दुचाकी आणि एका कारच्या माध्यमातून पाठलाग सुरू केला. आधीच माहिती मिळाल्याने पथक पोहोचण्यापूर्वीच अंधाराचा फायदा ट्रॅक्टर लोडर नदीपात्रातून पसार झाले. मात्र, पोलिसांनी वाळू तस्करांना माहिती देऊन सहकार्य करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. एक दुचाकी, एक कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.