Jalana: 'तलाठी प्रतिसाद देत नाहीत, पंचनामे कधी करणार?'; कृषिमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:02 IST2025-09-24T12:01:04+5:302025-09-24T12:02:08+5:30
दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन; ‘कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान पंचनाम्याविना राहणार नाही, दिवाळीपूर्वी मदत देणार’

Jalana: 'तलाठी प्रतिसाद देत नाहीत, पंचनामे कधी करणार?'; कृषिमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा संताप
बदनापूर (जालना): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, गेवराई बाजार आणि गोकुळवाडी येथे आले असता, त्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. तलाठी पंचनाम्यासाठी येत नाहीत, पंचनामे होऊनही मदत मिळत नाही, अशा तक्रारी करत शेतकऱ्यांनी ‘सरसकट नुकसान भरपाई’ची मागणी लावून धरली.
'आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही'
गेवराई बाजार शिवारात पाहणी सुरू असताना एका शेतकऱ्याने थेट मंत्र्यासमोरच आपली व्यथा मांडली. “माझी एक एकर शेती असून, जर मला नुकसान भरपाई मिळाली नाही, तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असे तो शेतकरी म्हणाला. या विधानाने कृषीमंत्री आणि उपस्थित अधिकारीही काही काळ अवाक् झाले. शेतकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनावर रोष व्यक्त केला. गुडघाभर पाणी साचलेल्या पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी कमालीचे संतप्त झाले होते.
पंचनामे तातडीने करण्याचे आदेश
शेतकऱ्यांचा संताप पाहून कृषीमंत्री भरणे यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, “जालना जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात ६ लाख ३५ हजार एकर, तर राज्यात ८० लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाला मी सूचना देतो की, नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचे पंचनामे झालेच पाहिजेत. एकही एकर क्षेत्र पंचनाम्याविना राहू नये. खरडून गेलेली जमीन आणि विहिरींचेही पंचनामे करा.”
बदनापूर येथे पाहणी दौऱ्यात कृषीमंत्र्यांसमोरच शेतकऱ्यांचा संताप; 'तलाठी फोन उचलत नाहीत', 'पंचनामे कधी करणार?' #Jalana#farmer#flood#rainpic.twitter.com/FiJnpnxSQ6
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 24, 2025
दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन
मदतीबद्दल बोलताना ते म्हणाले, “शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यानंतर १० दिवसांत किंवा दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करू. अशा संकटाच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने वागावे.” आमदार नारायण कुचे यांनीही शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, सरपंच संतोष नागवे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.