Jalana: वाळू माफियांचा हैदोस! तहसीलदारांचा मोबाईल हिसकावला अन् अंगावर घातली गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:33 IST2026-02-09T18:33:22+5:302026-02-09T18:33:41+5:30

माफिया एवढे मुजोर झाले आहेत की त्यांनी तहसीलदारांचा मोबाईल हिसकावून घेत अधिकाऱ्यांच्या अंगावर हायवा घालून पळ काढला.

Jalana: Sand mafia's horror! Tehsildar's mobile phone snatched and car driven over him | Jalana: वाळू माफियांचा हैदोस! तहसीलदारांचा मोबाईल हिसकावला अन् अंगावर घातली गाडी

Jalana: वाळू माफियांचा हैदोस! तहसीलदारांचा मोबाईल हिसकावला अन् अंगावर घातली गाडी

- फकिरा देशमुख
भोकरदन (जालना):
जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी आता पराकोटीला पोहोचली आहे. राजूर येथे अवैध वाळू वाहतूक पकडण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस पथकावर १४ जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, माफिया एवढे मुजोर झाले आहेत की त्यांनी जाफराबादच्या तहसीलदारांचा मोबाईल हिसकावून घेत अधिकाऱ्यांच्या अंगावर हायवा घालून पळ काढला. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय? ८ फेब्रुवारीच्या रात्री ११ च्या सुमारास सहायक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांना वाळू तस्करीची माहिती मिळाली. त्यानुसार तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे आणि जाफराबादचे प्रभारी तहसीलदार मंगेश साबळे यांच्यासह एक पथक साध्या खासगी गाडीने टेंभुर्णी रोडवर सापळा लावून थांबले होते. समोरून येणारी हायवा गाडी अडवली असता, चालक आणि १०-१२ जणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

मोबाईल हिसकावला अन् दिली जिवे मारण्याची धमकी 
झटापटीच्या वेळी जाफराबादचे तहसीलदार मंगेश साबळे यांनी संपर्क करण्यासाठी मोबाईल काढला असता, आरोपी विजय टोम्पे याने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी आरोपींनी "तुम्ही आमचं काही करू शकत नाही, तुम्ही नोकरी कशा करता?" अशा भाषेत तहसीलदारांना धमकावले. इतक्यावरच न थांबता, दुसरा चालक गाडीत बसला आणि त्याने थेट महसूल पथकाच्या अंगावर हायवा घालून पळ काढला. अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

जिल्हाधिकाऱ्यांचा 'ॲक्शन मोड'; एमपीडीए कारवाईचे संकेत 
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे. हल्ल्यातील सहभागी आणि सराईत वाळू तस्करांवर 'एमपीडीए' (MPDA) अंतर्गत तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी कारवाई करत एक हायवा जप्त केली असून गणेश सुरेश पालोदे याला अटक केली आहे. मात्र, घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.

Web Title : जालना: रेत माफिया का आतंक! तहसीलदार का फोन छीना, गाड़ी से मारने की कोशिश।

Web Summary : जालना में रेत माफिया ने अवैध परिवहन रोकने की कोशिश कर रहे अधिकारियों पर हमला किया। उन्होंने तहसीलदार का फोन छीन लिया और गाड़ी से उन्हें मारने की कोशिश की। पुलिस ने एक ट्रक जब्त किया और एक को गिरफ्तार किया; अन्य फरार हैं।

Web Title : Jalna: Sand Mafia Terror! Tahsildar's Phone Snatched, Vehicle Attempted Hit.

Web Summary : In Jalna, sand mafia attacked officials attempting to stop illegal transport. They snatched a Tahsildar's phone and tried to run him over with a vehicle. Police seized a truck and arrested one; others are absconding.