बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:10 IST2022-04-03T17:10:41+5:302022-04-03T17:10:51+5:30
जवळपास 15 फूट उंचावरुन उडी मारल्याने आरोपी सईद खान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
जालना : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालन्यात घडली घडली. सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी सईद खान उर्फ बिलाल याकूब खान (20, रा. कबाडी मोहल्ला, जालना) याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता आरोपी बिलाल याकूब खानला सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कोठडीतून चौकशीसाठी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या पिंक मोबाईलच्या कार्यालयात आणण्यात आले होते. चौकशी सुरू असतांना आरोपी सईद खान याने हातकडीसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला हिसका मारून, पहिल्या मजल्यावरुन पोलीस ठाण्याच्या आवारातील मोकळ्या जागेत उडी मारली.
जवळपास 15 फूट उंचावरुन उडी मारल्याने आरोपी सईद खान जखमी झाला आहे. या घटनेमुळे कदीम जालना पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पिंक मोबाईलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निशा बनसोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात सईद खान याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.