Jalana: जनावरांच्या गोठ्यात अवैध गर्भलिंगनिदान केंद्र; दोघे ताब्यात, भोकरदनमध्ये दुसरी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:19 IST2025-11-27T16:16:54+5:302025-11-27T16:19:43+5:30
गर्भलिंग तपासणीचे मशीन जप्त; दोघे ताब्यात, एक जण फरार

Jalana: जनावरांच्या गोठ्यात अवैध गर्भलिंगनिदान केंद्र; दोघे ताब्यात, भोकरदनमध्ये दुसरी कारवाई
भाेकरदन (जि. जालना) : सरकारी योजनेतून बांधलेल्या जनावरांच्या गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंगनिदान केंद्राचा स्थानिक गुन्हे शाखा, आरोग्य विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. ही कारवाई भोकरदन शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नांजावाडीजवळील गवळीवाडी शिवारात २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
सतीश बाळू सोनवणेे (रा. छत्रपती संभाजीनगर), केशव हरी गावंडे (रा. भोकरदन) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत, तर गोठा मालक समाधान विठ्ठल चोरमारे हा फरार झाला आहे. भोकरदन शहरापासून जवळच असणाऱ्या गवळीवाडी शिवारामध्ये एका जनावरांच्या गोठ्यामध्ये अनेक महिन्यांपासून अवैधपणे गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून बुधवारी सायंकाळी जिल्हा शल्यचिकित्सकांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकत्रित कारवाई करीत सतीश सोनवणे व भोकरदन येथील तेजस पॅथॉलॉजी लॅबचा चालक केशव गावंडे या दोघांना ताब्यात घेतले. गोठा मालक समाधान चोरमारे फरार झाला आहे. यावेळी गर्भलिंगनिदान करण्यासाठी आलेल्या तीन महिलांचे जबाबही पोलिसांकडून नोंदविले जात आहेत.
एक बारावी पास, दुसरा पॅथॉलॉजी चालक
या कारवाईतील दोन्ही संशयित डॉक्टर नाहीत. सतीश बाळू सोनवणे हा बारावी पास तर केशव हरी गावंडे हा भोकरदन शहरातील तेजस पॅथॉलॉजी लॅब चालक आहे.
यापूर्वी कारवाई का नाही
ज्या गोठ्यामध्ये गर्भलिंगनिदान व गर्भपात सुरू होते ते गवळीवाडी येथील जिल्हा परिषद वस्ती शाळेला लागूनच आहे. गावकऱ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे सदरील प्रकार हा अनेक महिन्यांपासून सुरू होता. काही दिवसांपूर्वी पूर्वी आरोग्य विभागाचे एक पथक या घटनास्थळी येऊन गेले होते. मात्र, कारवाई केली की तडजोड करून गेले याची माहिती गुलदस्त्यात असल्याची चर्चाही सुरू होती.
हे साहित्य केले जप्त
या कारवाईत गर्भलिंगनिदान करण्याचे मशीन, गर्भपाताच्या गोळ्या, टेस्ट ट्यूब इंजेक्शन, मोबाइल जप्त करण्यात आले आहे.
सोनवणे तीन प्रकरणांत आरोपी
या प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजीनगर येथील तरुण सतीश सोनवणे हा गर्भलिंगनिदान व गर्भपातप्रकरणी छत्रपती संभाजीनगर, बीड व जालना येथील यापूर्वीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. भोकरदन येथील गावंडे याची लॅब ही पोलिस स्टेशनपासून दोनशे फुटांवर आहे. तेथे अनेक महिन्यांपासून तो गर्भलिंगनिदान करत होता. मात्र, जास्त चर्चा झाल्याने गावंडे याने आपले बस्तान हे नांजावाडी शिवारातील गवळीवाडी येथे हलविले होते. या ठिकाणी सहा महिन्यांपासून हा गोरख धंदा सर्रास सुरू होता.
यांनी केली कारवाई
सदरील कारवाईत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, एलसीबीचे पोनि पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. योगेश उबाळे, सपोनि. सचिन खामगळ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, कर्मचारी विजय डिक्कर, दीपक घुगे, प्रशांत लोखंडे, इर्शाद पटेल, रमेश राठोड, रमेश काळे, सतीश श्रीवास, सोपान क्षीरसागर, गोदावरी सरोदे, सत्यभामा उबाळे व चालक गणपत पवार यांनी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ॲड. सोनाली कांबळे, डॉ. विजय वाकोडे, रेडिओलॉजिस्ट डॉ. ज्ञानेश्वर वायाळ, रेडिओलॉजिस्ट डॉ. कृष्णा वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, स्नेहल साळवे व आरोग्य विभागाचे कर्मचारी संजीवन लोखंडे, मनोज जाधव यांचा सहभाग होता.
भोकरदनमध्ये दुसरी कारवाई
भोकरदन येथे ७ जुलै २०२४ रोजी डॉ. दिलीपशिंग राजपूत याच्यासह अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सुद्धा भोकरदनमध्ये हा प्रकार सुरूच असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. गावंडे यांना कोणाचा वरदहस्त होता की, तो राजरोसपणे अवैध गर्भपात व गर्भनिदान केंद्र चालवत होता. याचा शोध घेतला घेतला तर अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.