Jalana: गोदावरीच्या पुराचे पाणी अंबड तालुक्यातील १६ गावात शिरले, १० हजार जण रेस्क्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:32 IST2025-09-29T11:31:02+5:302025-09-29T11:32:14+5:30
जिल्हा प्रशासन रात्रभर तळ ठोकून, आपेगाव येथील शाळा व मंगल कार्यालय पाण्यात गेले

Jalana: गोदावरीच्या पुराचे पाणी अंबड तालुक्यातील १६ गावात शिरले, १० हजार जण रेस्क्यू
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : १९ वर्षानंतर पुन्हा एकदा गोदावरीनदीला महापूर आला असून अंबड तालुक्यातील गोदाकाठच्या १६ गावात पाणी शिरले आहे. गोदावरीनदी पात्रात रविवारी रात्री ३ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदाकाठ परिसरातील नागरिकांनी रात्र जागून काढली आहे. दरम्यान, सोमवारी आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करून २ लाख ४५ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला.
महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभाग रविवारी दुपारपासून तळ ठोकून आहेत.जिल्हा प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन करून गोदाकाठच्या गावातून १० हजार जणांना बाहेर काढले आहे. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार विजय चव्हाण हे सुद्धा रात्रभर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये होते. गोंदी येथील सिद्धेश्वर मंदिरातील बालयोगी गोपाल महाराज व भक्तांसह १५ जणांना चप्पूच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. यावेळी गावातील नागरिक व प्रशासकीय यंत्रणा तळ ठोकून आहे.
गोदाकाठच्या आपेगाव, डोमलगाव ,गोरी, गंधारी, शहागड, गोंदी, हसनापूर, कोठाळा आदी गावात पाणी शिरले आहे. आपेगाव येथील मंगल कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरले आहे. त्याचबरोबर डोमलगावातील घराघरात पाणी शिरले आहे. कोठाळा गावात देवीच्या मंदिरात पाणी शिरले आहे.
अंबड तालुक्यातील गोदाकाठा परिसरात संभाव्य पूरस्थितीमुळे गोदाकाठचे अनेक कुटुंब स्थलांतर झाले आहेत. 10 गावातील 700 कुटुंबाने सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. यामध्ये गोंदी 140,वाळकेश्वर 125,कूरण 100, शहागड. 50,डोमलगाव. 20,गोरी 50, गंधारी 50, साष्टपिंपळगाव 50, कोठाळा 40, हसनापूर 40 यासह अन्य गावातील कुटुंब जिल्हा परिषद,शाळा समाज मंदिर, नातेवाईकांच्या घरी आदी ठिकाणी स्थलांतर झाले आहे.
माजी मंत्री धावले मदतीला
राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी गोदाकाठच्या नागरीकांना मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या घनसावंगी तालुक्यातील गुंज, नाथनगर, कुंभार पिंपळगाव, पिंपरखेड,तिर्थपुरी व अंबड तालुक्यातील अंकुशनगर व घुंगर्डे हादगाव या शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
गोदावरी नदीकाठ परिसरातील गावांत प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. उपविभागीय अधिकारी व मी स्वतः गोदाकाट परिसरात जाऊन पाहणी करत आहे. जेथे स्थलांतराची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहे. आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असून काही साहित्य लागल्यास ती टीम सुद्धा तयार आहे. एनडीआरएफ पथक ही सज्ज आहे.
- विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड