Jalana: छेडछाडीचा विरोध केल्याने तरुणीच्या कुटुंबावर हल्ला; वडिलांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:46 IST2025-07-04T15:28:23+5:302025-07-04T15:46:09+5:30
छेडछाडीचा विरोध केल्याने कुटुंबावर हल्ला; ९ जणांवर गुन्हा दाखल

Jalana: छेडछाडीचा विरोध केल्याने तरुणीच्या कुटुंबावर हल्ला; वडिलांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण
जालना: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे वडिलांवर लाठ्याकाठ्यांनी अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक घटना जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित व्यक्तीने आपल्या मुलीला त्रास देणाऱ्यांना जाब विचारला होता. या गोष्टीचा राग मनात ठेवून काही लोकांनी घरात घुसून त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी लाठ्याकाठ्यांनी पीडित व्यक्तीला गंभीर इजा केली. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना : मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारला म्हणून वडिलांना अमानुष मारहाण #jalana#marathwada#crimenewspic.twitter.com/MRXDE0ioW8
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 4, 2025
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सचिन पठाडे व गणेश काकडे या दोघांना अटक केली आहे. हे दोघे वाळू माफिया असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एकूण नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित सात आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.