Jalana: अपघातात मुलाचा जागीच मृत्यू; वारी अर्धवट सोडून गावी परतलेल्या आईने फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:02 IST2025-07-04T17:58:05+5:302025-07-04T18:02:06+5:30
विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीत गेलेली आई सावळ्याच्या दर्शनाविनाच आली माघारी

Jalana: अपघातात मुलाचा जागीच मृत्यू; वारी अर्धवट सोडून गावी परतलेल्या आईने फोडला टाहो
राजूर/मानदेऊळगाव : शिक्षणानिमित्त घरापासून दूर राहणाऱ्या मुलाला रुग्णालयात भेटण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.४० वाजता राजूर-जालना रोडवरील तुपेवाडी आश्रमासमोर घडली. आण्णा उर्फ दत्ता चंद्रकांत चापाईतकर (वय ३९, रा. देळेगव्हाण, ता. जाफराबाद) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीसोबत पंढरीकडे गेलेल्या आईने वारी अर्धवट सोडून गावाकडे धाव घेतली. शुक्रवारी गावात अंत्यसंस्कारासाठी परत आल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. अरे माझ्या वाघा आता परत येरे... अशी आर्त साद घातली. यावेळी आईचा हंबरडा ऐकून कुटुंबीयांसह उपस्थितांनी एकच आक्रोश केला.
जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील आण्णा उर्फ दत्ता चंद्रकांत चापाईतकर (वय ३९) यांचा मुलगा जालन्यापासून जवळच खरपुडी गावात शिक्षणासाठी राहत होता. दरम्यान, गुरुवारी मुलाचा हात फ्रॅक्चर झाला असून तो जालना येथील एका खासगी रुग्णालयात भरती असल्याची माहिती दत्ता यांना मिळाली. यामुळे गुरुवारी रात्रीच ९.२० वाजता देळेगव्हाण गावातून मुलाला पाहण्यासाठी दत्ता यांनी दुचाकीवरून जाण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, राजूर-जालना रोडवरील तुपेवाडी आश्रमाजवळ येताच चालकाने रस्त्याच्या मधोमध उभ्या केलेल्या एका ट्रक (एमएच-२१-बीएच-९६७७) ला पाठीमागून त्यांची दुचाकी जाऊन धडकली. यात ते जागेवरच बेशुद्ध पडले.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी येऊन त्यांना तत्काळ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डाॅक्टरांनी त्यांना तपासून गुरुवारी रात्री १० वाजता मृत घोषित केले. यावेळी प.पु. खडेश्वरी बाबा यांनी अपघातस्थळी येऊन नागरिकांच्या सहकार्याने मदत केली. चंदनझिरा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता शवविच्छेदन केले. त्यानंतर डॉक्टरांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता देळेगव्हाण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, भावजया, पुतण्या असा परिवार आहे.