Jalana Accident: उभ्या ट्रकला धडकल्या दोन दुचाकी; दोघे जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:08 IST2022-06-28T19:07:24+5:302022-06-28T19:08:35+5:30
डिझेल संपल्याने चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता.

Jalana Accident: उभ्या ट्रकला धडकल्या दोन दुचाकी; दोघे जागीच ठार
जालना : डिझेल संपल्याने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला दोन दुचाकी धडकल्याची घटना जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यात दोघेजण जागीच ठार झाले आहेत. मनोज अंकुश राठोड (२५ रा. काकडा तांडा), ज्ञानेश्वर मधुकर डवले (३२ रा. किहाळा वडगाव, ता. मंठा) अशी मयतांची नावे असल्याची माहिती पोलीस कर्मचारी बेराड यांनी दिली.
ट्रक क्रमांक (एमएच. २६. ८८१२) हे सोमवारी रात्री नांदेडला जात होते. जालना- मंठा रोेडवरील सिंधी काळेगाव परिसरातील अंबिका धाब्याजवळ ट्रकचे डिझेल संपले. त्यामुळे चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. चालक डिझेल आणण्यासाठी गेला होता. साडेआठ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. त्याचवेळी बुलेट क्रमांक (एमएच.१८.एव्ही.३०) ने मनोज राठोड हे गावाकडे जात होते. पावसामुळे त्यांना ट्रक न दिसल्याने बुलेट ट्रकला धडकली. यात ते जागीच ठार झाले. त्यांना रूग्णालयात पाठविण्यात आले.
काही वेळाने ज्ञानेश्वर डवले यांची दुचाकीही ट्रकला धडकली. यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे एएसआय सय्यद व पोलीस कर्मचारी बेराड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.