Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:03 IST2025-11-21T12:52:23+5:302025-11-21T13:03:21+5:30
एका चिमुकल्या मुलीने शाळेतच जीवन संपवल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
जालना: शिक्षणाचे मंदिर असलेल्या शाळेतच एका १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना जालन्यात घडली आहे. शहरातील सीटीएमके गुजराथी विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या छतावरून उडी घेऊन आरोही दिपक बिटलान या चिमुरडीने आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आरोहीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आरोही दिपक बिटलान ही अवघ्या १३ वर्षांची होती आणि तिचे शाळेत जाणे-येणे सुरू होते. तिच्या आत्महत्येमुळे तिच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या छतावरून आरोहीने उडी घेऊन आत्महत्या केली. ही बातमी समोर येताच जालना शहरात एकच खळबळ उडाली.
आई-वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी शाळेतील शिक्षकांना जबाबदार धरले आहे. शिक्षकांच्या त्रासामुळेच आरोहीने हे पाऊल उचलले, असा त्यांचा ठाम आरोप आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी प्रशासनाकडे कठोर मागणी केली आहे. "या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी शिक्षकांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तातडीने अटक करावी," अशी मागणी विजय लहाने यांनी केली आहे.
एका चिमुकल्या मुलीने शाळेतच आत्महत्या केल्याने, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, पालकांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.