मोदी-शाहांच्या सरकारमध्ये देवदेवतांच्या नावाखाली हिंदूंचीच अडवणूक; जरांगेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:27 IST2025-08-27T12:26:36+5:302025-08-27T12:27:28+5:30
'देव-देवतांच्या नावाखाली हिंदूंचीच अडवणूक का?' मोदी, शाह यांना जरांगेंचा थेट सवाल

मोदी-शाहांच्या सरकारमध्ये देवदेवतांच्या नावाखाली हिंदूंचीच अडवणूक; जरांगेंचा गंभीर आरोप
वडीगोद्री ( जालना): मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढाईची घोषणा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. मराठा आंदोलनाची अडवणूक करण्यासाठी सरकार देव-देवता आणि सणांचा आधार घेत असल्याचा आरोप करत, जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
वडीगोद्री येथून मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मराठा बांधवांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, "आम्ही पिढ्यानपिढ्या हिंदू देवतांची पूजा करतो, तरीही सणासुदीच्या काळात आमचीच अडवणूक का? देव-देवतांच्या नावाखाली हिंदूंचीच अडवणूक केली जात आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी हिंदू विरोधी म्हणून कोण काम करतं याचं उत्तर द्यावं."
जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. "फडणवीस यांना त्यांची चूक झाकण्यासाठी देव-देवतांना पुढे केलं जात आहे. इंग्रजांच्या काळातही उपोषणं रोखली गेली नाहीत, पण हे सरकार तेच करत आहे," असे ते म्हणाले. या माध्यमातून सरकार मराठा समाजाच्या आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
ही आरपारची शेवटची लढाई, डोक्याने जिंकायची आहे
मराठा आरक्षणासाठीची आता 'आरपारची' लढाई असून, ही लढाई संयम आणि डोक्याने जिंकायची आहे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे. जरांगे म्हणाले की, "ही आपली शेवटची लढाई आहे. आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल, पण कोणत्याही परिस्थितीत संयम ढळू देऊ नका. मराठा समाजाची मान खाली जाईल असं कुणीही वागू नये."
सगळ्यांनी साथ द्या
आपले आंदोलन शांततेत सुरू राहील, याची खात्री देत ते म्हणाले, "एकही दगडफेक किंवा जाळपोळ करायची नाही. जोपर्यंत ही लढाई जिंकत नाही, तोपर्यंत सावध राहायचं आहे." राजकारणात असलेल्या मराठ्यांना त्यांनी समाजाचं रक्षण करण्याची संधी सोडू नका, असे आवाहन करत सगळ्यांनी साथ देण्याची विनंती केली.