गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्याविरोधात आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:26 IST2018-11-19T00:25:48+5:302018-11-19T00:26:44+5:30
नाशिक येथील कडा विभागाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक यांनी गंगापूर व पालखेड धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा आदेश १ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला होता. सदरील आदेशाच्या संदर्भात सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये सुनावणी होणार आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्याविरोधात आज सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नाशिक येथील कडा विभागाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक यांनी गंगापूर व पालखेड धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा आदेश १ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला होता. सदरील आदेशाच्या संदर्भात सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती या प्राधिकरणाचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी तसेच मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्राव्दारे दिली.
दरम्यान, या सुनावणीसाठी आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही उपस्थित राहून बाजू मांडावी लागणार आहे.
सदरील प्रकरणी होणारी सुनावणी सोमवारी दुपारी २ वाजता मुंबई येथील जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कार्यालयात घेतली जाणार असल्याचे लाखे पाटील म्हणाले.
एकूणच मराठवाड्यातील तीव्र दुष्काळ लक्षात घेता न्यायालयाकडूनही याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले. पाण्याच्या मुद्दयावर राजकारण बाजूला ठेवून आपण पुढाकार घेत असल्याचे ते म्हणाले.
धरण समूहातून एकूण २५४.५० द.ल.घ.मी म्हणचेच ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे स्पष्ट देण्यात आले होते. याशिवाय वरील सर्व धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, तसेच पाणी वहनावर नियंत्रण ठेवणे, पाण्याची नोंद ठेवणे, अहवाल शासनास सादर करणे ही संपूर्ण जबाबदारी मुख्य अभियंता (जलसंपदा) जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांची असेल आणि सदर आदेश हे तात्काळ अंमलात आणावेत, असेही २३ आॅक्टोबरच्या आदेशात नमूद केलेले होते, असेही डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटले आहे.