चार जनावरे तलावाच्या गाळात फसल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:50 IST2019-05-23T00:49:42+5:302019-05-23T00:50:24+5:30
मच्छिंद्र चिंचोली येथील लघु तलावात शिंदखेड येथील शेतकरी बाळकृष्ण ढेकळे यांची चार जनावरे पाणी पिण्यासाठी गेलेली असताना गाळात फसली. पण, सुदैवाने गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे ती चारही जनावरे वाचली.

चार जनावरे तलावाच्या गाळात फसल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथील लघु तलावात शिंदखेड येथील शेतकरी बाळकृष्ण ढेकळे यांची चार जनावरे पाणी पिण्यासाठी गेलेली असताना गाळात फसली. पण, सुदैवाने गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे ती चारही जनावरे वाचली.
ढेकळे यांचा गुराखी नामदेव जाधव याने २० जनावरे पाणी पाजण्यासाठी म. चिंचोली येथील लघु तलावावर बुधवारी दुपारी ३ वाजता आणली. त्यातील दोन गाय व दोन वासरे पाणी पिता- पिता पुढे सरकली असता ती पूर्णपणे गाळात फसली. दरम्यान, अशोक सोळंके व सय्यद केयफ हे युवक आपली जनावरे घेऊन पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना ही जनावरे फसलेली दिसली. त्यांनी हा प्रकार गावात येऊन सांगितला. यानंतर आस्था तेथील तरुण साहेबराव घोगरे, मच्छिंद्र निवदे, भास्कर पाळीक, विनोद घोगरे, परमेश्वर घोगरे, उमेश रणमाळे, नारायण वर्जे यांनी लघु तलावाकडे धाव घेऊन गाळात फसलेली लाकडी बल्लीने च्या साह्याने जनावरे बाहेर काढली. अन्यथा काही अनुचित प्रकार घडला असता.
यापुढे प्रशासनाने तातडीने जनावरांच्या चारा- पाण्याची सोय करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
याच ठिकाणी २०१८ मध्ये धुने धुवायला गेलेल्या सहा मुली गाळात फसल्या होत्या. त्यापैकी तीन मुलींना आपला जीव गमवावा लागला होता.
याच ठिकाणी पाणवठा असता तर ही जनावरे फसली नसती व त्या मुलींनीही आपला जीव गमावला नसता या तलावाची निर्मिती १९९४ ला झाली आहे.
दुष्काळामुळे यावर्षी पाणी फक्त नदीच्या पात्रात राहिलेले असून पात्रात ५ ते १० फूटापर्यंत गाळ आहे. १९९४ पासून या तलावात आतापर्यंत १२ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जनावरे ही फसून मेली आहेत.