अतिवृष्टीत घर कोसळल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्याचा संसार उघड्यावर, दहा शेळ्याही दगावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 16:02 IST2022-10-22T16:01:32+5:302022-10-22T16:02:48+5:30
संततधार पावसाने मातीचे घर कोसळले. त्यात घरासमोर बांधलेल्या दहा शेळ्यांच्या अंगावर घराची भिंत पडल्याने त्या गतप्राण झाल्या.

अतिवृष्टीत घर कोसळल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्याचा संसार उघड्यावर, दहा शेळ्याही दगावल्या
- गणेश पंडित
केदारखेडा (जालना) : भोकरदन तालुक्यातील कोदोली येथील एका शेतकऱ्याचे शनिवारी सकाळी अतिवृष्टीमुळे घर कोसळले. या घटनेत त्यांच्या दहा शेळ्या दबून जागीच ठार झाल्या. सुखदेव त्रिंबक गिरणारे असे आपत्तीग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून, ऐन दिवाळीच्या दिवशी त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
केदारखेडा परिसरात गेल्या दोन, दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसात पशुपालक सुखदेव गिरणारे यांचे मातीचे घर कोसळले. घरासमोर बांधलेल्या दहा शेळ्यांच्या अंगावर घराची भिंत पडल्याने त्या गतप्राण झाल्या. ऐन दिवाळीच्या तोंडावर निवारा आणि पशुधन हातचे गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. यात त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा तलाठी पी.बी.समिंद्रे यांनी पंचनामा केला असून वरिष्ठांना नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.
आपत्तीग्रस्त शेतकरी गिरणारे हे अल्पभूधारक आहेत. त्यांनी जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केलेला आहे. अतिवृष्टीत शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे ते आधीच खचलेले असताना त्यांचे पशुधनही अतिवृष्टीमुळे हिरावून नेले. ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचा सर्व संसार मातीत मिसळल्याने ते हवालदिल झाले आहे. ते राहत असलेल्या घरावर जुन्या गढीची दरड कोसळल्याने हा अपघात झाला. यात घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्याचे नुकसान झाले. घरापुढे बांधलेल्या दहा शेळ्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी ३ शेळ्या उकरून काढल्या. परंतु, त्यांनीही प्राण सोडला होता. या घटनेत त्यांचे अंदाजे ३ लक्ष रुपयाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आपत्तीग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तहसीलदारांना या घटनेची माहिती दिली. गिरणारे कुटुंबाना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
अनेकांनी दिला मदतीचा हात
दिवाळीच्या तोंडावर गिरणारे कुटुंबावर आलेले संकट लक्षात घेऊन डॉ. चंद्रकांत साबळे यांनी किराणा साहित्य व पाच हजारांची मदत केली. गावातील भगवान गिरणारे यांनी ३ हजार रुपये, ग्रा.पं. सदस्य संजय गिरणारे व चेअरमन गणेश गिरणारे यांनी प्रत्येक १ हजार रुपये, रामेश्वर गिरणारे व विनोद शिवाजी गिरणारे यांनी प्रत्येक ५०० रुपये अशी एकूण ११ हजारांची मदत गावकऱ्यांनी गिरणारे कुटुंबाना केली आहे.