'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:56 IST2025-06-30T13:55:52+5:302025-06-30T13:56:26+5:30

सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यादरम्यान, आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या.

'Don't cry baby...I'm giving you a butter ball'; Jalna girl's slur goes viral | 'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल

'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल

- राहुल वरशिळ
जालना :
सध्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यात विविध वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. हे विद्यार्थी कीर्तन, भजन आणि विठ्ठलाचा जयघोष करीत तल्लीन होताना दिसत आहेत. यातच आळंदी देवाची येथील राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेची इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणारी मूळ जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील हातडी येथील शिवानी रामदास शिंदे हिने "रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते आणि तुला लोण्याचा गोळा खायला देते" ही गवळण गायली. त्यानंतर या गवळणचा  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यादरम्यान, आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी संस्थाचालक हभप स्वरांजली हिंगे यांनी शिवानीला एक गवळण गाण्यास सांगितली. यावेळी रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे अंगात रेनकोट घालून कशाचीही तमा न करता भरपावसात शिवानीने "रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते आणि तुला लोण्याचा गोळा खायला देते" ही गवळण गायली. यावेळी दिंडीतील एका व्यक्तीने शिवानीचा व्हिडीओ काढून २३ जून रोजी सोशल मीडियावर अपलोड केला. सुमधुर आवाजातील या गवळणचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, दोन लाखांच्यावर नेटकऱ्यांनी तो पाहिला असून लाइक्, कमेंटकरून शिवानीचे सर्वजण कौतुक करत आहेत. 

ही तर माउलींचीच कृपा...
सध्या राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेत एकूण १०० मुली शिक्षण घेत आहेत. सध्या आषाढी एकादशीनिमित्त आयोजित प्रदर्शनात शिवानीने गायलेली गवळण खूपच लोकप्रिय झाली. त्याचा मला खूप आनंद झाला आहे. ती एका वर्षापासून आमच्या संस्थेत शिक्षण घेत आहे. तिच्यामुळे आमच्या संस्थेचे नाव सर्वांना माहिती झाले आहे. ही माउलींची कृपा म्हणावी लागेल.
- हभप स्वरांजली हिंगे, संस्थाचालक, राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची.*

वारकरी संप्रदायाचा वारसा कायम जपणार
माझ्या आजी-आजोबांपासून परमार्थाचा वारसा लाभलेला आहे. सध्या माझे वडील रामदास शिंदे दिंडीत सहभागी झाले आहेत. मी राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असून, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत सहभागी झाले असून, हा आम्हाला लाभलेला वारकरी संप्रदायाचा वारसा कायम पुढे जपणार आहे.
- शिवानी रामदास शिंदे, हातडी, ता. परतूर, जि. जालना.

Web Title: 'Don't cry baby...I'm giving you a butter ball'; Jalna girl's slur goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.