धामणा धरणाच्या सांडव्याला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:34 IST2019-07-04T00:34:02+5:302019-07-04T00:34:33+5:30
शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. या गळतीमुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे

धामणा धरणाच्या सांडव्याला गळती
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन (जि.जालना) : तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. या गळतीमुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी धरणाच्या खालील शेलूद, लेहा, पारध खु, पारध बु, या गावांसह बुलडाणा जिल्ह्यातील म्हसला या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोकरदन तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारीही पावसाने दमदार हजेरी लावली. पाण्याची आवक वाढल्याने धामणा धरणात ८५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. मात्र, मंगळवारी रात्रीपासून सांडव्याच्या खालच्या बाजूस ५ ते ६ चिरे पडले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. त्यामुळे धरण फुटण्याची चर्चा परिसरात सुरू झाली आणि नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, तहसीलदार संतोष गोरड, कनिष्ठ अभियंता एस.जी.राठोड आदींनी धामणा धरण परिसराची पाहणी केली. पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गळती रोखण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.