धरणात पाणी असूनही कालव्यातून पाणी सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:51+5:302021-02-06T04:55:51+5:30

शेतक-यांचा आक्रोश : पाटबंधारे विभागाला निवेदन टेंभुर्णी- अकोलादेव येथील जिवरेखा धरण तुडूंब भरले असतानाही कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याने ...

Despite the water in the dam, water did not flow from the canal | धरणात पाणी असूनही कालव्यातून पाणी सुटेना

धरणात पाणी असूनही कालव्यातून पाणी सुटेना

शेतक-यांचा आक्रोश : पाटबंधारे विभागाला निवेदन

टेंभुर्णी- अकोलादेव येथील जिवरेखा धरण तुडूंब भरले असतानाही कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याने टेंभुर्णीसह परिसरातील पिके सुकू लागली आहे. यामुळे कालवा परिसरातील शेतक-यांचा रब्बी हंगामच धोक्यात आला असून, कालव्यातून त्वरीत पाणी सोडावे, असा आक्रोश शेतकरी करीत आहे. याबाबत टेंभुर्णी येथील शेतक-यांनी निवेदन पाटबंधारे विभागाला गुरुवारी दिले.

कालवा परिसरातील शाळूज्वारी, मका, गहू, हरभरा अशी सर्व पीके सध्या पाण्यावर आली असून, पहिल्या पाण्यानंतर कालव्यातून दुसरे पाणी सोडण्यास विलंब झाल्याने अनेक ठिकाणी सध्या पिकांनी माना टाकल्या आहेत. यामुळे धरणात पाणी असूनही डोळ्यादेखत पिके वाळताना पाहण्याची दुदैर्वी वेळ शेतकर्यांवर आली आहे. यामुळे शेतक-यांतून आक्रोश व्यक्त केला जात असून, त्वरीत पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे.

चौकट

यावर्षी जिवरेखा धरणातून पाणी सुटणार म्हणून कालवा परिसरातील सर्वच शेतकर्यांनी रब्बी हंगामाची पेरणी जोमात केली. कालव्यातून पहिले पाणी सुटून दीड महिण्याचा कालावधी उलटला तरी दुसरे पाणी न सुटल्याने आता पिके सुकू लागली आहे. पाटबंधारे विभाग गेट नादुरुस्तीचे कारण पुढे करीत असले तरी त्यांनी उभारी घेत असलेल्या पिकांच्या जीवाशी खेळू नये व शेतकर्यांचा अंत पाहू नये.

रंगनाथ जमधडे, शेतकरी, टेंभुर्णी.

चौकट-

धरणातून दुसरे पाणी सोडताना मंगळवारी गेटचा रॉड तुटल्याने तुर्त गेटचा भाग पूर्णत: दाबण्यात आला आहे. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गेट दुरुस्ती कठीण असली तरी दुरूस्तीसाठी कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहे. अन्य मार्गाने पाणी सोडता येवू शकते का त्याचाही विचार केला जात आहे. पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभाग सकारात्मक आहे.

माधुरी जुन्नारे, शाखा अभियंता, टेंभुर्णी

फोटो- शाखा अभियंता माधुरी जुन्नारे यांना निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव शिंदे, माजी सरपंच विष्णू जमधडे, रंगनाथ जमधडे आदी. दुसऱ्या छायाचित्रात पाण्याअभावी पिके अशी सुकू लागली आहे.

Web Title: Despite the water in the dam, water did not flow from the canal