सरकार अन् मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार -बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:56 IST2019-08-06T00:56:08+5:302019-08-06T00:56:52+5:30
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यास सरकार आणि मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी येथील गुरूगणेश मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

सरकार अन् मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार -बाळासाहेब थोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजप-शिवसेनेच्या भूलथापांमुळे जनता त्यांना पुरती वैतागली आहे. आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यास सरकार आणि मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होईल. काँग्रेस पक्ष हा जनतेच्या मनातील पक्ष आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी येथील गुरूगणेश मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.
पुढे बोलतांना थोरात म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार हे राज्यघटनेला नख लावण्याचे काम करत आहे. भारताची राज्यघटना तयार करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चौफेर विचार केल्यानेच आज समाजातील गरीबांना सन्मान मिळाला आहे. त्यांना मतदानाच हक्क दिल्यानेच हे शक्य झाले. राज्य घटनेत समता, बंधूता आणि एकोप्याला महत्व दिले आहे. हे तत्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून मांडले आहे. पसायदानातील अनेक तत्वांचे प्रतिबिंब हे राज्यघटनेत दिसत असल्याचेही थोरात यांनी नमूद केले.
राज्यात दुष्काळाने शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेराजगारीचा प्रश्न गंभीर आहे. पुरामूळे नागरिक हैराण असतांना मुख्यमंत्री मात्र प्रचारात व्यस्त आहे. यावरूनच त्यांना शेतकरी आणि सामान्यांची किती काळजी आहे. हे दिसून येते. कर्जमाफी, कर्जाचे पुनर्गठन आणि पीकविमा देण्याच्या नावाखाली देखील सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप थोरात यांनी केला. पीककर्ज वाटप केवळ ३० टक्केच असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ३४ हजार कोटीची कर्जमाफीची घोषणा खोटी असून, केवळ १२ हजार कोटी रूपयांचेच कर्जमाफ झाले आहे. ते करण्यासाठी देखील अनेक अटी व शर्थीुळे शेतकरी हैराण असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेवरही त्यांनी जोरदार टीका करून पीकविम्याचा मोर्चाही त्यांनी चुकीच्या कंपनी समोर काढल्याचे सांगितले.
सत्तेत राहून मंत्री मंडळ बैठक तसेच विधानसभेत आवाज उठविण्या ऐवजी शिवसेना केवळ दिखावा करत असल्याचे थोरात म्हणाले. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून काहीजण बाजूला झाले. परंतु मुख्यमंत्री काँग्रेसचाच झाला होता याची आठवण करून देतांनाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख मात्र थोरतांनी खुबीने टाळला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमास माजी आ. कैलास गोरंट्याल, कल्याण काळे, धोंडीराम राठोड, शकुंतला शर्मा, अ.भा. काँग्रेस समितीचे सदस्य भीमराव डोंगरे, कल्याण दळे, माजी जिल्हाध्यक्ष आर.आर. खडके, रामप्रसाद कुलवंत, माजी मंत्री अनिल पटेल, माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी, राजेंद्र राख, राजेश राठोड, राजेश काळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, राम सावंत, बदर चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी केले.
अशोक चव्हाण : मराठवाड्याला राज्य सरकारकडून सापत्न वागणूक
राज्यातील युती सरकार हे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. बेरोजगारी वाढत असून, शेतकरी आत्महत्या होत आहेत. जवळपास १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्चन करण्या ऐवजी यात्रा काढून आपल्या कामांचा गवगवा मुख्यमंत्री करत आहे. यातूनच सरकारला शेतक-यांविषयी किती जिव्हाळा आहे, हे दिसून येते. मराठवाडा विभागाला हे सरकार सावत्र मुला सारखी वागणूक देत आहे. मराठवाड्यात ना गुंतवणूक आली ना रोजगाराचा प्रश्न सुटला.
आगामी काळात युती सरकारला पराभूत करण्यासाठी आपसातील गटबाजी दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मराठवाडा विभागाच्या अनुशेषा संदर्भात लढा उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. इव्हीममध्ये भाजपच्या दिग्गजांनी तांत्रिक घोटाळा केला आहे. परंतु तो सिध्द करता येत नसल्याने त्यांची चलती असल्याचे चव्हाण म्हणाले. भाजपमधिल मेगा भरती ही धाक दाखवून केली जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या धूळफेकीची जागृती करावी.
कुलकर्णींना निवडून आणा
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव कुलकर्णी यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मतदारांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मेळाव्यात बोलतांना व्यक्त केली. सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आ. राजेश टोपे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांची उपस्थिती होती.