नगर विकास खात्याच्या असहकारावरून काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 16:01 IST2020-08-21T13:57:21+5:302020-08-21T16:01:30+5:30
आमदार कैलास गोरंट्याल यांची नगर विकास खात्याचे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार

नगर विकास खात्याच्या असहकारावरून काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी
जालना : शहरासह मतदार संघाच्या विकासासाठी नगर विकास खात्याकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आली. काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने पाठपुरावा केला. मात्र, मागणीनुसार निधी काही मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसमधील आमदार नाराज असून, या नाराजीचा विस्फोट केव्हाही होऊ शकतो, असा सूचना वजा इशारा जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.
जालना नगर पालिकेला स्वच्छ भारत अभियानात देशात २२ वा, लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नगर पालिकेने ७५ टक्के काम केल्यानंतर ही रँकींग मिळाली आहे. भविष्यात १०० टक्के काम करून रँकींग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. शहर आणि मतदार संघाच्या विकासासाठी काँग्रेस आमदारांनी राज्याच्या नगर विकास खात्याकडे वेळोवेळी निधीची मागणी केली आहे.
निधीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, नगर विकास खात्याकडून काँग्रेसच्या आमदारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ही बाब आम्ही आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांना सांगितली आहे.
नगर विकास खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याची बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही भेट घेऊन सांगितली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनामुळे निधीची अडचण आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत. मात्र, मागणीनुसार विकास कामांसाठी निधी न मिळाल्यास आमच्या नाराजीचा विस्फोट केव्हाही होऊ शकतो, असा सूचना वजा इशारा यावेळी आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी दिला.