बहिणीच्या लग्नापूर्वीच भावाचा अंत; वाळूतस्करांच्या टिप्परची रिक्षाला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 16:05 IST2022-05-10T15:59:33+5:302022-05-10T16:05:05+5:30
चुलत बहिणीच्या लग्नाचा मांडव घालण्यासाठी जांभळीचा हिरवा पाला आणण्यासाठी तरुण घराबाहेर पडला होता

बहिणीच्या लग्नापूर्वीच भावाचा अंत; वाळूतस्करांच्या टिप्परची रिक्षाला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू
टेंभुर्णी (जालना ) : वाळूच्या भरधाव टिप्परने एका रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत एक तरुण जागीच ठार, तर रिक्षामधील अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना टेंभुर्णी- जाफराबाद रस्त्यावरील टेंभुर्णीपासून काही अंतरावर असलेल्या रणवीर ढाब्याजवळ सोमवारी रात्री घडली. दरम्यान, चुलत बहिणीच्या लग्नाचा मांडव घालण्यासाठी जांभळीचा हिरवा पाला आणावयास गेलेल्या भावाचा बहिणीच्या लग्नापूर्वीच करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
येथील सय्यद अतिक सय्यद जाकीर पठाण (१७) याच्या चुलत बहिणीचे बुधवारी लग्न होते. हिरवा मांडव टाकण्यासाठी शेतात तोडून ठेवलेली जांभळीची पाने आणण्यासाठी सय्यद अतिक व अन्य तिघे मिळून घरच्या रिक्षात बसून सोमवारी रात्री शेतात गेले होते. पाला घेऊन परतत असताना रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या रिक्षेला टेंभुर्णीहून जाफराबादकडे चाललेल्या वाळूच्या एका भरधाव टिप्परने धडक दिली. यात रिक्षाने तीन ते चार पलट्या खाल्ल्या. या भीषण अपघातात सय्यद अतिक हा जागीच ठार झाला, तर त्याच्या सोबत असलेले अकबर महंमद कुरेशी, आसेफ अय्युब पठाण व सय्यद मुजम्मिल सय्यद महेबूब हे तिघे गंभीर जखमी झाले.
जखमींवर टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यातील दोघांना अधिक उपचारासाठी जालना येथे रेफर करण्यात आले आहे. दरम्यान, बहिणीच्या लग्नापूर्वीच भाऊ अतिक याचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अतिकचा टेंभुर्णी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.