"धूर, आगीचे लोट अन् मृत्यूशी झुंज!"; जालना एमआयडीसीत ठिबक सिंचन कंपनीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 19:51 IST2026-02-12T19:51:18+5:302026-02-12T19:51:48+5:30
सुदैवाने कर्मचारी वाचले, पण लाखो रुपयांचं साहित्य भस्मसात; ८० लिटर केमिकल फोमने मिळवलं नियंत्रण.

"धूर, आगीचे लोट अन् मृत्यूशी झुंज!"; जालना एमआयडीसीत ठिबक सिंचन कंपनीला भीषण आग
जालना : शहरातील एमआयडीसी फेज तीन भागात असलेल्या एका ठिबक सिंचन कंपनीला गुरूवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीत प्लास्टिकची उत्पादने असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमनच्या जवानांना कसरत करावी लागली. ८० लिटर केमिकल फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
जालना शहरातील एमआयडीसी फेज-३ परिसरात एक ठिबक सिंचन कंपनी आहे. या कंपनीतील उत्पादिक ठिबक सिंचनास गुरूवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागताच कार्यरत असलेले कर्मचारी कंपनीबाहेर धावले. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीचे लोट इतके प्रचंड होते की काळ्या धुराचे ढग दूरवरूनही दिसत होते. प्लास्टिक व रसायनयुक्त साहित्य असल्यामुळे आग झपाट्याने पसरली.
जालन्यात ठिबक सिंचन कंपनीला भीषण आग; काळ्या धुराने व्यापलं आभाळ, अडीज तासांनंतर आगीवर नियंत्रण. #jalana#marathwadapic.twitter.com/uK6fPMPZKl
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 12, 2026
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबासह घटनास्थळी धाव घेतली. दोन ते अडीच तास प्रयत्न करीत सुमारे ८० लिटर केमिकल फोमचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळास चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि. बाळासाहेब पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनीही धाव घेत मदत कार्य केले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अग्निशमन अधिकारी एस. बी. दराडे, फायरमन संतोष काळे, नितेश ढाकणे, रविनाथ बनसोडे, जॉन गवळी, सादिक अली, चालक यंत्र चालक विनायक चव्हाण, पंजाबराव देशमुख, वाहन चालक संजय हिरे यांनी परिश्रम घेतले.