मुंबई, औरंगाबादेत बाईक चोरून जालन्यात विक्री; सराईत गुन्हेगार अटकेत, १२ दुचाकी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 18:13 IST2022-07-02T18:11:29+5:302022-07-02T18:13:07+5:30
औरंगाबाद, अहमदनगर, बुलडाणा व मुंबईसह इतर शहरातून दुचाकी चोरून आणल्याची आरोपीने कबुली दिली.

मुंबई, औरंगाबादेत बाईक चोरून जालन्यात विक्री; सराईत गुन्हेगार अटकेत, १२ दुचाकी जप्त
अंबड (जालना) : मुंबईसह इतर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्यांची जालन्यात विक्री करणाऱ्या दोघांना अंबड पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. हरी शिवदास वंजारी (रा. वलखेड), रामा लक्ष्मण जाधव ( उमापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ४ लाख रूपये किंमतीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
हरी वंजारी हा त्याच्या साथीदारासह चोरीची दुचाकी आणून किनगाव चौफुली भागात विक्री करीत असल्याची माहिती सपोनि. नरके यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह सापळा लावून हरी वंजारी याला ताब्यात घेतले. त्याला त्याच्याजवळील दुचाकीबाबत विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दुचाकी तपासणी केली असता, सदरील दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
त्याला ताब्यात घेऊन आणखी विचारपूस केली असता, त्याने सांगितले की, साथीदार रामा जाधव याच्या मदतीने औरंगाबाद, अहमदनगर, बुलडाणा व मुंबईसह इतर शहरातून दुचाकी चोरून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी रामा जाधव याला ताब्यात घेतले. दोघांच्या ताब्यातून जवळपास ४ लाख रूपये किंमतीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सोमनाथ नरके, पोउपनि. योगेश जाधव, एम. बी. स्कॉट, विष्णू चव्हाण, मनजित सेना, दीपक पाटील, संदीप जाधव, स्वप्नील भिसे, अरूण लहाने, वंदन परवार, सागर बावीस्कर यांनी केली.