मारहाण करून हातपाय बांधले अन् कालव्यात फेकले; 'तो' मृतदेह निघाला एका शेतकऱ्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:23 IST2026-03-31T18:23:06+5:302026-03-31T18:23:49+5:30

शेतात गेले अन् परतलेच नाही; हातपाय बांधून कालव्यात फेकलेल्या मृतदेहाची ओळख पटली

Beaten, tied up, and thrown into a canal; 'That' body turned out to be that of a farmer | मारहाण करून हातपाय बांधले अन् कालव्यात फेकले; 'तो' मृतदेह निघाला एका शेतकऱ्याचा

मारहाण करून हातपाय बांधले अन् कालव्यात फेकले; 'तो' मृतदेह निघाला एका शेतकऱ्याचा

मंठा (जि. जालना): जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाटोदा शिवारात २६ मार्च रोजी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह विडोळी (ता. मंठा) येथील किसन बाबासाहेब अवचार यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृताचे हातपाय दोरीने बांधलेले होते आणि त्यांच्या अंगावर व गुप्तांगावर गंभीर जखमा होत्या, ज्यामुळे ही हत्या अत्यंत क्रूरपणे केल्याचे समोर आले आहे.

मंठा पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

शेतात गेले अन् घातपात झाला
किसन अवचार हे व्यवसायाने शेतकरी होते आणि बहुतांश वेळ शेतातच कामासाठी थांबत असत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ते शेतात जातो असे सांगून घरातून निघाले, मात्र ते पुन्हा परतलेच नाही. २६ मार्च रोजी दुपारी पाटोदा शिवारातील कालव्यात एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते.

पोलिसांच्या प्रयत्नांना यश
गेल्या पाच दिवसांपासून पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर रेंगे आणि पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नीलेश ईधाटे, संतोष माळगे व त्यांच्या पथकाने मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर रविवारी हा मृतदेह किसन अवचार यांचाच असल्याची खात्री नातेवाईकांनी केली. या भीषण हत्येमागील कारण काय? आणि ही हत्या कोणी केली? या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत.

विडोळी गावावर शोककळा
एक कष्टाळू शेतकरी म्हणून ओळख असलेल्या किसन अवचार यांची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्याने विडोळी गावात संताप आणि भीतीचे वातावरण आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पोलिसांनी संशयास्पद मोबाईल कॉल्स आणि जुन्या वादांच्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली असून लवकरच आरोपी जेरबंद होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title : किसान की नहर में हत्या; हाथ-पैर बंधे हुए थे।

Web Summary : किसान किसन अवचर जालना के मंठा में एक नहर में मृत पाए गए। उनके हाथ-पैर बंधे हुए थे, और उन्हें गंभीर चोटें आई थीं। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।

Web Title : Farmer found murdered in canal; hands and feet were tied.

Web Summary : Farmer Kisan Avchar was found dead in a canal in Mantha, Jalna. His hands and feet were bound, and he had severe injuries. Police have registered a murder case and are investigating.