The amount of counseling for addiction; 90 patients undergo treatment ... | व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाची मात्रा; २२९ रूग्णांनी घेतले उपचार...

व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाची मात्रा; २२९ रूग्णांनी घेतले उपचार...

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दारू, तंबाखूजन्य पदार्थांसह इतर व्यसनामुळे शरीरावर, मनावर होणारे परिणाम दूरगामी आहेत. अशा व्यसनामुळे त्रस्त झालेले २२९ जण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. या रूग्णांवर औषधोपचार करण्यासह व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत समुपदेशन केले जात आहे.
बदलत्या जीवनशैलीत अनेकांना व्यसनाची लागण होत आहे. विशेषत: युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे. मौजमजेसाठी म्हणून सुरू होणारे दारू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन नंतर अनेकांच्या सवयीत रूपांतरित होते. जडणाऱ्या या व्यसनामुळे संबंधितांच्या मानसिकतेवर, शरीरावर परिणाम होतोच. शिवाय त्यांच्या कुटुंबावर, समाजावरही मोठा परिणाम होताना दिसतो. अशा व्यसनामुळे कौटुंबिक, शारीरिक अडचणी निर्माण झाल्यानंतर अनेकजण व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. व्यसनापासून मुक्तता करून घेण्यासाठी जालना येथील जिल्हा रूग्णालयातही अनेकजण उपचारासाठी येत आहेत.
जिल्हा रूग्णालयातील मानसोपचार विभागात अशा व्यसनाधीन रूग्णांवर उपचार करून त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गत वर्षभरात जिल्हा रूग्णालयात ८५ जणांनी उपचार घेतले आहेत. यातील अनेकजण व्यसनमुक्त झाले आहेत. तर चालू वर्षात व्यसनमुक्त होण्यासाठी येणा-या रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. बाह्यरूग्ण विभागात नवीन ४८ तर जुने ४० रूग्ण उपचारासाठी येतात. तर अंतररूग्ण विभागात नियमित येणाऱ्यांची संख्या ५६ आहे. अशा रूग्णांना औषधोपचार करण्यासह दारू, तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक दुष्परिणाम याबाबत जागृती करून समुपदेशन केले जात आहे. समुपदेशनामुळे अनेक रूग्ण व्यसनापासून मुक्त होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या कामी रूगणांच्या नातेवाईकांचीही मदत घेतली जात असून, व्यसनमुक्तीसाठी पथ्यपाण्यावरही मोठा भर दिला जात आहे.

Web Title: The amount of counseling for addiction; 90 patients undergo treatment ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.