All the aided teachers will get the identity card | अनुदानित सर्व शिक्षकांना मिळणार ओळखपत्र
अनुदानित सर्व शिक्षकांना मिळणार ओळखपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासनाने शिक्षकांना ओळखपत्र ठेवण्याचे आदेश या अगोदरच दिले होते. परंतु, शिक्षकांनी याकडे पाठ फिरवली आहे. शिक्षकांनी ओळखपत्र घालूनच ज्ञानगर्जना करावी, यासाठी आता समग्र शिक्षा अभियानाने पुढाकार घेतला असून, सर्व शिक्षकांना या अभियानांतर्गत ओळखपत्र देण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारत सरकारने कार्यक्षमता प्रतवारी दर्शके निर्माण केले आहेत. यामुळे प्रत्येकस्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत असणे आवश्यक आहे. राज्य शासन कार्यक्षमता प्रतवारी दशकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक व अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना ओळखपत्र देण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. याबाबत शासनाने अध्यादेश जारी केला आहे.
ओळखपत्रासाठी राज्यातील पहिली ते आठवीच्या शासकीय व अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी प्रति शिक्षक ५० रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. या ओळखपत्रामध्ये शाळेचे किंवा संस्थेचे नाव, शाळेचा युडायस क्रमांक, शिक्षकाचा फोटो, संपूर्ण नाव, पदनाम, जन्मतारीख, रक्तगट आदींची माहिती यावर राहणार आहे
शासनाने या ओळखपत्रासाठी काही नियम व अटी ठेवलेल्या आहेत. ओळखपत्रावर महाराष्ट्र शासनाचा लोगो वापरू नये, अनुदानित शाळा असल्यास अनुदानित शाळा एवढाच उल्लेख करावा, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची ओळखपत्र जिल्हा किंवा तालुकास्तरावर तयार करण्यात यावे. याबाबतचा खर्च सुद्धा जिल्हा किंवा तालुकास्तरावर करावा. प्रति ओळखपत्र ५० रुपयांच्यावर खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी, आदी नियम व अटी शासनाने दिलेल्या आहेत.
जिल्ह्यातील ८ हजार शिक्षकांना फायदा
जालना जिल्ह्यात ८ हजार २३० शिक्षक आहे. या शिक्षकांसाठी ४.११५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Web Title: All the aided teachers will get the identity card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.